कोल्हापूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही कोल्हापूर दौऱ्यावर असून पूरग्रस्तांची विचारपूस करत आहेत. यावेळी शाहुपुरीत आजी-माजी मुख्यमंत्री आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. दोघांमध्ये काही मिनिटे संवादही झाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस घटनास्थळावरुन निघून गेले. ठाकरे-फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे शाहुपुरीत प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. शिवाय कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसलं.

मुख्यमंत्र्यांशी संवादानंतर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पूराच्या मुद्द्यावर कायमस्वरुपी उपाय शोधला पाहिजे, इतक्या कमी वेळात आश्वासन देता येत नाही. त्यांनी बैठक बोलावली तर आम्ही येण्यास तयार आहोत, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निरोपानंतर फडणवीस शाहुपुरीत आल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी फोन करुन सांगितल्याने फडणवीस शाहुपुरीत थांबल्याचं सूत्रांनी सांगितलं. आजी-माजी मुख्यमंत्री आमनेसामने आल्याने नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे.

अधिक वाचा  महापालिका निवडणूक लांबणीची शक्यता; प्रतीक्षा सरकारच्या अधिसूचनेची

कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकाच वेळी कुंभार गल्ली येथे आले. या ठिकाणी दोघांनी समोरासमोरच काहीवेळ चर्चाही केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ताफा निघून गेला. आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा कुंभार गल्ली थांबला. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा दौरा आज जिल्ह्यात आहे. फडणवीस हे आंबेवाडी चिखली, उत्तरेश्वर पेठ येथील दौरा करून शाहूपुरी कुंभार कुंभार गल्लीतील पूरग्रस्तांचे संवाद साधत असतानाच दहा मिनिटाच्या अंतरावरच मुख्यमंत्र्यांचा ताफा सुद्धा कुंभार गल्लीत आला. यावेळी पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी फडणवीस पूरग्रस्तांशी संवाद साधत असतानाच मुख्यमंत्री ठाकरे आल्याचे त्यांना समजले. त्यानंतर ते मागे आले. आणि पुढे जात असणारे मुख्यमंत्री ठाकरे थांबले. काही वेळ त्यांनी चर्चा केली आणि मुख्यमंत्री सरळ कुंभार गल्लीत गेले.