कोरोनाच्या संकटातून थोडासा दिलासा मिळाल्यावर विकास कामांना वेग आला आणि पुणे शहरात ड्रेनेज लाईन, एल अँड टी चे 24×7 पाणी पुरवठा योजनेचे काम, महावितरणचे मोठ्या वीजवाहक तारा भूमिगत करण्याचे काम, मेट्रो शी संबंधित कामे, जियो सह विविध केबल कंपन्यांची कामे यातून संपूर्ण शहरच खोदले गेले. सामान्य पुणेकर नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून यावरती त्वरित उपाय करण्यात यावा अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष व पुणे शहर भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिला आहे.

अधिक वाचा  ममतांचा मुंबई दौरा: मविआत धुसफूस, तर भाजपला पोषक; राजकारण वेगळ्या वळणावर?

रस्त्यांची झालेली चाळण आणि त्यातच पावसाळा सुरु झाल्याने सामान्य पुणेकर हवालदिल झाले आहेत, पादचारी असो वा दुचाकीस्वार, चारचाकी खड्ड्यातून उडाल्यावर बसणारा दणका असो वा वाहनाचे होणारे नुकसान किंवा किरकोळ अपघात, सामान्य नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. त्यातच भर म्हणून ज्या भागात / चौकात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचते तेथे कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. वारंवार पाठपुरावा करून ही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होताना दिसून येत नाही.

एकतर रस्ते पूर्ववत करण्यात दिरंगाई होतं आहे आणि ज्या ठिकाणी रस्ते पूर्ववत केल्याचा दिखावा केला आहे तेथील अवस्था अत्यन्त वाईट आहे. काही लोकप्रतिनिधिंशी चर्चा केली असता त्यांनी देखील वारंवार तक्रार करून ही कामे होतं नसल्याचे धक्कादायक सत्य समजले. अनेक ठिकाणी तर खोदाई नंतरचा राडारोडा ही तसाच पडलेला दिसतो.

अधिक वाचा  ओमिक्रॉन व्हेरिएंट: प्राथमिक शाळा 1 डिसें लाच सुरू होणार- टोपे

कृपया तातडीने रस्ते पूर्ववत करावेत व जेथे काम व्यवस्थित झालेले नाही तेथे त्वरित लक्ष द्यावे वा संबंधित ठेकेदार व कामात कुचराईस जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी आग्रही मागणी करत आहे. येत्या दहा दिवसात योग्य कार्यवाही न झाल्यास प्रशासनाच्या दिरंगाई वा कामातील कुचराई विरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे संदीप खर्डेकर यांनी दिला आहे.