कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवल्या गेलल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने झुंजार खेळ करत भारताला ४ गड्यांनी मात दिली आहे. या विजयासह यजमान संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. भारताच्या १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेची सुरुवात खराब झाली. पण सामनावीर धनंजय डि सिल्वाने केलेल्या चिवट खेळीमुळे श्रीलंकेला हा विजय साकारता आला. या सामन्यात लंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकत प्रथम भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

अकिला धनंजया आणि वनिंदू हसरंगा या फिरकीपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे श्रीलंकेने भारताला २० षटकात ५ बाद १३२ धावांत रोखले. प्रत्युत्तरात श्रीलंकेने २ चेंडू राखत हे आव्हान पूर्ण केले. करोनाची बाधा झालेल्या कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्यामुळे भारताचे अनुभवी क्रिकेटपटू टी-२० मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, नितीश राणा आणि चेतन साकारिया यांना आज टी-२० पदार्पणाची संधी मिळाली.

अधिक वाचा  इतिहासातील सर्वांत मोठी 41 टक्के वाढ; विलीनीकरणावर कर्मचारी ठाम

श्रीलंकेचा डाव
भारताच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अविष्का फर्नांडोला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने वैयक्तिक ११ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर सदिरा समरविक्रमा, कर्णधार दासुन शनाका, वनिंदू हसरंगा हे एकापाठोपाठ बाद झाले.

खेळपट्टीवर स्थिरावलेला सलामीवीर मिनोद भानुका ३६ धावा काढून कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. शतकी पल्ला गाठण्याअगोदर लंकेचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. १७व्या षटकात लंकेने शतक फलकावर लावले.

शतक पूर्ण झाल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने रमेश मेंडिसला माघारी धाडले. शेवटच्या दोन षटकात श्रीलंकेला २० धावांची गरज होती. भुवनेश्वरने टाकलेल्या १९व्या षटकात धनंजय डि सिल्वाने केलेल्या फटकेबाजीमुळे श्रीलंकेला १२ धावा मिळाल्या.

अधिक वाचा  एसटी कर्मचाऱ्यांना संघटनांनी अडवू नये !; गुन्हे दाखल करण्यासही मुभा

२०वे षटक पदार्पणवीर चेतन साकारियाने टाकले. या षटकात दोन चेंडू शिल्लक ठेऊन लंकेने विजय साकारला. यजमान संघाकडून धनंजय डि सिल्वाने नाबाद ४० धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक २ बळी घेतले.

भारताचा डाव

पदार्पणाची संधी मिळालेला महाराष्ट्राचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने कर्णधार शिखर धवनसोबत सलामी दिली. पदार्पणात मोठ्या खेळीकडे प्रवास करताना श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने ऋतुराजला यष्टीपाठी झेलबाद केले. ऋतुराजने २१ धावा केल्या. ऋतुराज-शिखरने ४९ धावांची सलामी दिली. ऋतुराज बाद झाल्यानंतर दुसरा पदार्पणवीर देवदत्त पडिक्कल मैदानात आला. त्याने आणि धवनने संघाची धावगती वाढवली.

अधिक वाचा  वारजेत रंगला लोक्रतिनिधी - पत्रकार सामना: इंडोटेक रायझिंग कपचे लोक्रतिनिधी मानकरी

१३व्या षटकात फिरकीपटू अकिला धनंजयाने पहिल्याच चेंडूवर भारताच्या कर्णधाराला माघारी धाडले. धवनने ५ चौकारांसह ४० धावांची खेळी केली. शतकाचा टप्पा ओलांडण्यापूर्वी भारताने देवदत्त पडिक्कलला गमावले. पडिक्कलने २९ धावा केल्या. हसरंगाने त्याला बाद केले. टी-२०मध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा संजू सॅमसनही आज ७ धावांवर माघारी परतला.

धनंजयाने पुन्हा गोलंदाजीला येत त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्यानंतर भुवनेश्वर आणि नितीश राणा यांनी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना चेंडू सीमारेषेपार पोहोचवण्याच अपयश आहे. लंकेकडून अकिला धनंजयाने ४ षटकात २९ धावा देत २ बळी घेतले.