शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आजी-माजी नेत्यांमध्ये जोरदार वाक्‌युद्ध कायमच रंगलेले असते. ते महाविकास आघाडीच्या आधीही आणि महाविकास आघाडी असतानाही कायमच आहे.

त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकांमध्ये ते कायम राहणार असल्याने स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत बिघाडी कायम राहणार हे जरी निश्‍चितच मानले जात आहे.

तर जुन्नरमध्ये शिवसंपर्क अभियानात शिवसेनेच्या उपनेत्यांनीच आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज राहा, असा आदेश दिल्याने स्थानिक पातळीवर शिवसेनेकडून ‘एकला चलो रे नारा’ दिला गेला असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागात शिरूर-हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्‍यांचा समावेश आहे. यात खेड, जुन्नर तालुक्‍यांमध्ये शिवसेनेचे दबदबा मोठा असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला तोडीस तोड देण्याची धमक आहे. तर आंबेगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच प्राबल्य अधिक आहे.

अधिक वाचा  कुसुमाग्रज निवासस्थानापासून वाजत गाजत ग्रंथदिंडी; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!

शिरूर-हवेली तालुक्‍यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समवेत माऊली कटके यांच्याकडून पक्षवाढीचे काम जोरदार सुरू असल्याने आगामी काळात या तालुक्‍यांमध्ये शिवसेनेचे भविष्य उज्ज्वल मानले जात आहे.

त्यामुळे नवनवीन कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेना आगेकूच करीत आहे. नव्या दमाच्या शिलेदारांवर आढळराव पाटील ‘एकला चलो रे नारा’ देत शिवसेना राष्ट्रवादीला सडेतोड उत्तर देण्यास सज्ज असल्याचे सांगत आहे.

शिरूरच्या आजी-माजी खासदारांमध्ये कायमच जोरदार थेट कार्यक्रमांमधून किंवा सोशल मीडियाद्वारे वाक्‌युद्ध कायमच सुरू असते. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. तर जुन्नर तालुक्‍याच्या आजी-माजी आमदारांसोबतच कार्यकर्त्यांकडून टीका-टिप्पणी सुरू असते.

त्यातच माजी आमदार हे थेट खळखट्ट्याकची भाषा करीत असल्याने जनताही त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर इतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आपल्यापरीने जनतेचा विश्‍वास पुन्हा निर्माण करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत माजी आमदारांच्या वर्तनामुळे पुन्हा दगाफटका होऊ नये, यासाठी शिवसेनेला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.

अधिक वाचा  इराणमधील सफरचंदे बाजारात दाखल; सुकामेव्याची आवकही सुरळीत

खेडमध्ये पंचायत समितीचे नाट्य रंगतदार

खेड पंचायत समितीवरून शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जोरदार फायटिंग सुरू आहे. तर आता पंचायत समिती सभापतीवरून शिवसेनेतच दोन गट पडले आहे. तर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या नव्या गटाला जोरदार चपराक बसल्याने ते सभापती भगवान पोखरकर यांना पाठिंबा देणार, आपला विरोध कायम ठेवणार की पक्षच थेट व्हिप जारी करणार हे निवडणूक लागल्यावर समजेलच तोपर्यंत वेट आणि वॉचची भूमिका पार पाडावी लागणार.

वरिष्ठांच्या दबावाला झुकणार का?

शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी एका झेंड्याखाली लढली तर शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कार्यकर्त्यांचे ‘सूत’ जुळणार का आणि जर हे ‘सूत’ वरिष्ठांच्या दबावामुळे जुळले तर त्याचा फटका ऐन निवडणुकीत बसू शकतो.

अधिक वाचा  omicron Virus ची 23 देशांत धडक, WHO चा गंभीर इशारा

त्यामुळे निवडणूक लागण्याच्या अगोदरच जर ‘महाविकास आघाडी’ की ‘स्वबळावर’ याचा निर्णय झाल्यास कार्यकर्त्यांसह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना त्यापद्धतीने ‘फिल्डिंग’ लावणे सोपे जाणार आहे.

जुन्नरमध्येही दोन गट…

माजी आमदारांना शिवसेनेने आपल्या गोटात सहभागी करून घेतल्याने जुन्नर तालुक्‍यातील निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत. तर यातील काही शिवसैनिकांची पक्षांतून हकालपट्टीही करण्यात आली होती. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक अद्यापही आम्ही शिवसैनिकच आहोत ते कायमच सांगत आहेत. तर आता त्या निष्ठावंत शिवसैनिकांना पुन्हा पक्षात बोलवले जात असले, तरी ते पक्षात येण्यासाठी काही अटी ठेवणार का?

आले तर त्यांना पक्षात आधीसारखा मानसन्मान मिळेल का? याची चाचपणी करूनच हे कार्यकर्ते निर्णय घेतील, अशी राजकीय गोटात चर्चा आहे. हे शिवसैनिक परत पक्षात आले तर जुन्नरमध्ये शिवसेनेची ताकद दुप्पट वाढणार हे नक्‍की.