पुणे : महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचा अभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा मोठा विषय आहे. या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास, वाचन आणि लेखन करून स्वत: काही करी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. पण, शिवचरित्राविषयी अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे, अशी भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी व्यक्त केली.

आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे गुरुवारी (२९ जुलै) शंभराव्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त बोलताना पुरंदरे यांनी ‘शंभरावं वर्ष लागलं. त्यासाठी मी वेगळे काही केले नाही. मला कसलेही व्यसन नाही. मी शंभर वर्षे जगावे ही जणू विधात्याची इच्छा होती. आणखी आयुष्य मिळाले तर स्वावलंबी जीवन लाभावे’ अशी इच्छा प्रदर्शित केली.

अधिक वाचा  परमबीर सिंह यांचं निलंबन? मुख्यमंत्री ठाकरेंकडून स्वाक्षरीही

पुरंदरे म्हणाले, आयुष्यात मी खूप शिकलो. शिकविण्याचा आव कधी आणता आला नाही. खेळण्यात बालपण गेले. जे शिकवितात ते गुरू एवढेच मला ठाऊक होते. या गुरूंविषयी आपण आदर बाळगला पहिजे. आपल्यासाठी राबणाऱ्या आई-वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात करणे योग्य नाही. आई-वडिलांशी गोड बोला. ते ओंजळीने भरभरून देतील हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. आपल्या हातून कोणाचाही अपमान आणि कोणाचेही नुकसान होता कामा नये. कोणाचाही राग करू नका, अशी शिकवण मला वडिलांनी दिली.

हौस असलेला आणि जबरदस्त महत्त्वाकांक्षा असलेला माणूस कधीही समाधानी नसतो. मी आनंदी असलो तरी समाधानी नाही. खूप काम करावे असे वाटते. पण, प्रकृती साथ देत नाही. सगळे लोक प्रेमाने भेटतात. प्रकृतीने साथ दिली तर खूप काही लिहिण्याची इच्छा आहे. सर्वाना घेऊन रायगडावर जायचे आहे.

अधिक वाचा  मुंबईच आर्थिक राजधानी राहणार कुणी कितीही स्वप्न पहा; नवाब मलिक हे म्हणाले

– शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे