महापालिकेचे अंदाजपत्रक ८ हजार कोटीच्या पुढे गेले आहे, पण त्यातून नागरिकांना काय सुविधा मिळाल्या ? एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कुठे गेला याची माहिती घेऊन सत्ताधारी भाजपने  काय केले याची पोलखोल करा. आगामी महापालिका निवडणूकीसाठी आपापल्या वॉर्डाचे संघटन मजबूत करा, असे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले.

तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी बुधवारपासून विधानसभा मतदारसंघनिहाय शाखा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. आज पहिल्या दिवशी कसबा, पर्वती व हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक मतदारसंघाची किमान दीड ते दोन तास बैठक घेऊन चर्चा केली, पदाधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे हे देखील ऐकून घेतले. दरम्यान, राज ठाकरे यांच्याशी थेट संवाद साधता आल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह निर्माण झाला होता. सकाळी साडे नऊच्या सुमारास सुरू झालेल्या बैठका सायंकाळी पाच वाजता संपल्या.

अधिक वाचा  सरस्वतीच्या ठेकेदारांवर शाई फेकल्याचा एवढा तांडव होणार तर सावित्रीवर शेण फेकल्याचा बदला तिचेच लेक घेणार. - प्रविण गायकवाड

आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना होईल की वॉर्ड रचना याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, मनसेने वॉर्ड रचनेला महत्त्व देऊन त्याच पद्धतीने संघटनेचे सर्व पदे भरावीत. गेल्या पाच वर्षात प्रत्येक प्रभागात कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत, महापालिकेचे अंदाजपत्रक ८ हजार कोटीच्या पुढे गेले आहे. पण त्या प्रमाणात काम झालेले दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक भागाची माहिती काढून स्टिंग आॅपरेशन करा असे आदेशही बैठकीत दिले आहेत.

‘‘आज कसबा मतदारसंघाची सुमारे दीड तास बैठक झाली, त्यामध्ये प्रत्येक मतदारसंघातून १० नगरसेवक निवडून येतील या पद्धतीने मनसेने काम केले पाहिजे, संघटना मजबूत करण्यावर भर द्या. सत्ताधारी भाजपने काय काम केले आहे याची पोलखोल करा, नागरिकांपुढे हे विषय मांडा असेही सांगितले आहे.