नवी दिल्ली – कर्नाटकात येडियुरप्पा यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ बसवराज बोम्मई यांच्या गळ्यात घालण्यात आली. भाजपने गटनेते म्हणून बसवराज बोम्मईंची निवड केली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच बोम्मईई यांचे नाव मुख्यमंत्री होणाऱ्या बाप-लेकांच्या यादीत समाविष्ट होईल. देशातील अनेक राज्यांमध्ये वडिलांनंतर मुलाने सुद्धा मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. पिता-पुत्रांच्या मुख्यमंत्र्यांच्या जोडीमध्ये महाराष्ट्रातील एक जोडी आहे.

उत्तर कर्नाटकातील असलेले लिंगायत नेते बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांचे सुपुत्र आहेत. एस आर बोम्मई हे 1988 ते 1989 या कालावधीत कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. बोम्मई यांनी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गृह, कायदा, संसदीय आणि कामकाज मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे.

अधिक वाचा  आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा फेटाळला

बोम्मई यांच्या अगोदर कर्नाटकात आणखी एका बाप लेकाच्या जोडीने मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि त्यांचे सुपुत्र एच डी कुमारस्वामी. कर्नाटकात येडियुरप्पांच्या आधी कुमारस्वामी मुख्यमंत्री होते.

दक्षिणेतील राज्य तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आहेत. तेसुद्धा या यादीत असून त्यांचे वडील एम करुणानिधी यांनीही मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं. करुणानिधींच्या निधनानंतर स्टॅलिन यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला जबरदस्त विजय मिळवून देत ते राज्याचे मुख्यमंत्री बनले.

महाराष्ट्रातील चव्हाण पिता पुत्रांचा मुख्यमंत्र्यांच्या अशा जोडीत समावेश आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे वडील दिवंगत शंकरराव चव्हाण हेसुद्धा मुख्यमंत्री होते. देशात जम्मू काश्मीरमध्ये अब्दुल्ला कुटुंबियात तर तीन पिढ्यांमध्ये मुख्यमंत्रीपद आहे. पहिल्यांदा शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांनीही मुख्यमंत्रीपद भूषवलं.

अधिक वाचा  भाजप-जदयू ठिणगी कुठे पडली?; नितीश कुमार यांचा राजीनामा

उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव या पितापुत्रांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळली आहे. अरुणाचल प्रदेशात मुख्यमंत्री पेमा खांडू आणि त्यांचे वडील दोरदी खांडू हेसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री होते. हरियाणातील चौटाला कुटुंबातही पिता पुत्राच्या जोडीने राज्याचे नेतृत्व केले आहे. यामध्ये देवी लाल आणि त्यांचे सुपुत्र ओम प्रकाश चौटाला यांच्या नावाचा समावेश आहे.

आंध्र प्रदेशात सध्याचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी हे माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचे सुपुत्र आहेत. तर ओडिसामध्ये नविन पटनायक यांचे वडील बीजू पटनायक हे सुद्धा मुख्यमंत्री होते. झारखंडमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन यांनी बाजी मारत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. त्यांचे वडील शिबू सोरेन यांनीही राज्याची सूत्रे सांभाळली होती.