मुंबई : कोकणासह राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मदतीचे पॅकेज राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत मंजूर करण्यात येणार आहे. या पॅकेजचे स्वरूप निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी बैठक झाली. पाच हजार कोटी वा त्यापेक्षाही अधिक रकमेचे पॅकेज बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

आजच्या बैठकीला विविध विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. झालेले नुकसान प्रचंड असून निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची आवश्यकता आहे, याबाबत बैठकीत एकमत झाले. विविध विभागांनी या बैठकीत नुकसानीचा प्राथमिक आकडा सांगितला. शेतकरी, व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान, सामान्य नागरिकांची झालेली हानी याबाबत विविध जिल्ह्यांच्या यंत्रणांनी जी आकडेवारी दिली ती बघता मदतीचे पॅकेज किमान ५ हजार कोटी रुपयांचे असेल, अशी शक्यता आहे. त्यात उद्ध्वस्त झालेल्या नागरी सुविधांच्या उभारणीचाही समावेश असेल. राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता एवढ्या रकमेची तजवीज कशी करायची, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडचणी मांडल्या.

अधिक वाचा  शिवेंद्रराजेंच्या कार्यशैलीचे पवार साहेबांकडून कौतुक, सिल्व्हर ओकवर भेट

एका मंत्र्यांनी सांगितले की, आज रात्री आणि उद्या दिवसभर बसून विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती एकत्रित करतील. त्यामुळे पॅकेज हे ५ हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याकडून ते दिले जाईल. मोठ्या दुकानदारांना प्रत्येकी ५० हजार रुपये, तर लहान दुकानदारांना १० हजार रुपयांची मदत दिली जाऊ शकते.

व्यवसाय पुन्हा उभारण्यासाठी व्यापाऱ्यांना अल्प व्याज दराने कर्ज दिले जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच विशेष सबसिडी देण्यावरही चर्चा झाली. कोल्हापूर, सांगली परिसराला २०१९ मध्ये महापुराचा तडाखा बसला होता. त्यावेळी ज्या धर्तीवर मदत दिली गेली तशीच मदत यावेळी दिली जाऊ शकते.