पुणे- वाहतूक शाखेतील पोलीस निरक्षकाने पोलीस ठाण्यातच इंटेरिअर डेकोरेटला मारहाण केली. घरातील इंटेरिअर डेकोरेशनचे काम व्यवस्थित केले नाही असे म्हणत त्याच्याकडे दिलेले पैसे परत मागण्यात आले. यानंतर त्याच्या कुटूंबीयांचाही मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकाच्या दहशतीमुळे तक्रारदारचे कुटूंब घाबरलेले आहे. राजेश पुराणिक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

फिर्यादी कार्तिक रामनिवास ओझा यांनी पोलीस निरीक्षक (वाहतूक शाखा) राजेश पुराणिक यांच्या नाना पेठ परिसरातील राहत्या घराचे इंटेरिअर डेकोरेशन चे काम घेतले होते. त्या कामाचे कोटेशन कार्तिक यांनी पुराणिक यांना दिले तसेच त्यावरती त्यांची मंजुरी घेऊन कामास सुरवात केली. त्यांच्या घराचे काम जवळपास 70 % पूर्ण झाले. त्यावेळी कार्तिक ओझा यांनी पुढील कामासाठी तसेच कामगारांचे पगार देण्यासाठी पुराणिक यांच्याकडे उर्वरित पैश्‍याची मागणी केली.

अधिक वाचा  "अशा ठिकाणी कशाला जायचं?" फडणवीसांचा साहित्य संमेलनाला जायला नकार

मात्र पुराणिक यांनी कामामध्ये अनेक त्रुटी काढल्या आणि पैसे देणार नाही असे सांगितले. तेव्हापासून ते कार्तिक यांस काम सुरु करताना दिलेले माझे पैसे मला परत पाहिजे अन्यथा तुला कायद्याच्या जाळ्यात अडकून तुझ्यावर कादेशीर कारवाई करेल अशी धमकी देत आहेत. ते आठ दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे धमक्‍या तसेच पैशाची मागणी करीत आहेत. ते कार्तिक यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील मानसिक त्रास देत आहे.

दरम्यान, पुराणिक यांनी कार्तिक ओझा यांना समर्थ वाहतूक विभागात सगळी कागदपत्रे घेऊन बोलवले. तेथे पैसे दिले नाहीत म्हणून त्यांना बुटाने व लाथा बुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण करण्यात आली. कागदपत्रांवर सही घेतली. कार्तिक यांचा मोबाईलही जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आला. यावरुन त्याच्या संपर्कातील व्यक्तीचा चुकीचे मेसेजही पाठविण्यात आले. याप्रकरणी ओझा यांच्या बहिणीने पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. तसेच पोलीस निरीक्षकाने कार्तीकला पिस्तूल दाखविल्याचाही आरोप केला आहे. समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; धक्कादायक निर्णय

पुराणीक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल असल्याची आपल्याला अद्याप माहिती नाही. समर्थ पोलिस ठाण्याशी संपर्क साधून मातिही घेतली जाईल. यानंतरच प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल.

– राहुल श्रीरामे  (पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा)

तक्रार अर्ज प्राप्त झाल्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे.

– विष्णू ताम्हाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन)