पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून (दि. २८) पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर आले असून, तीन दिवस पक्षाचे शाखाध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, पदाधिकारी व इच्छुक मनसे सैनिक यांच्या नवीन नेमणुका व मुलाखती घेणार आहेत, अशी माहिती मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी नुकताच पुणे दौरा करून विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी जो शाखाध्यक्ष चांगले काम करेल, त्याच्या घरी जेवायला जाणार असल्याचे जाहीर केले होते.

अधिक वाचा  ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

आता पुन्हा पुणे दौऱ्यावर येत ठाकरे यांनी, बुधवार, गुरुवार व शुक्रवार असे तीन दिवस मनसेच्या नवीन कार्यालयात उपस्थित राहून इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून ते प्रत्येक मतदारसंघातील प्रभागनिहाय चार शाखाध्यक्ष, प्रत्येक प्रभागात दोन उपविभाग अध्यक्ष निवडणार आहेत. तसेच ते शहरातील स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करणार आहेत.