बंगळुरू : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आता बस्वराज बोम्मई यांना संधी मिळाली आहे. बस्वराज बोम्मई यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. उद्याच बस्वराज बोम्मई मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा रंगली होती. पण, अखेर आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी किशन रेड्डी यांनी बंगळुरूमध्ये बैठक घेतली आहे. त्यानंतर बस्वराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा केली.

बोम्मई यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल येडियुरप्पा यांनी आनंद व्यक्त केला आहे. बोम्मई यांची गटनेतेपदी निवड झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या नावाला समर्थन दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. राज्यात ते चांगल्या प्रकारे काम करतील, अशा सदिच्छा सुद्धा येडियुरप्पा यांनी दिल्यात.

अधिक वाचा  एसटी कर्मचाऱ्यांची कोंडी ; ६२३ जणांच्या बदल्या

बस्वराज हे आधी येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री आणि कायदे आणि न्याय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते. बोम्मई यांचे वडील कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री राहिले आहे. लिंगायत समजातून आलेले बस्वराज बोम्मई कर्नाटकमध्ये दुसऱ्या नंबरचे नेते समजले जातात. येडियुरप्पा यांच्या सर्वात जवळचे ते नेते आहे. बोम्मई यांनी 2008 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

हावेरी जिल्ह्यातील शिगगांव मतदारसंघातून 2008 ला निवडणूक लढवली आणि जिंकून आले. सलग ३ वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता बोम्मई हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री झाले आहे.