कारगील विजय दिनानिमित्त पोलिसांसह विविध संघटनांनी केले होते आवाहन

उस्मानाबाद – कारगील विजय दिनानिमित्त सोमवार दि. 26 जुलै रोजी कळंब तालुक्यातील शिराढोण पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिराला दात्यांनी रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळाला. तब्बल 576 दात्यांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान केले. आजवर जिल्ह्यात सर्वाधिक रक्तदानाची उच्चांकी नोंद या शिबिरात झाली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रक्तसाठा कमी आहे. ही परिस्थिती ओळखून शिराढोण पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून कारगील विजय दिनाचे औचित्य साधून सोमवार, दि. 26 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पोलीस पाटील संघटना, पत्रकार बांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने जास्तीत जास्त दात्यांनी शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. शिबिरात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवूर रक्तदान केले. दिवसभर रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत गेला. रक्तदात्यांचा वाढता प्रतिसाद सर्वांना थक्क करणारा होता.

अधिक वाचा  धारावीचा पुनर्विकास अदानीच करणार; ५००० कोटींची बोली; प्रकल्प पूर्तीस १७ वर्ष लागणार 

जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस उपधिक्षक मोतीचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव नेटके, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोडसे, पोलीस उपनिरीक्षक अनंत तांबारे यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. शिबिराला प्रचंड  प्रतिसाद मिळाला. दिवसभर रक्तदानाचा महायज्ञ शिराढोण व परिसरातील ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातुन सुरूच होता. यावेळी परिसरातील सर्वांचे आभार सपोनि वैभव नेटके व त्यांच्या सहकार्यानी मानले.

*सपोनि वैभव नेटके यांचे ‘नेटवर्क’ कामी*
शिराढोण पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक वैभव नेटके हे पूर्वाश्रमीचे शिक्षक. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून ते पोलीस खात्यात रुजू झाले. सध्या सहायक पोलीस निरीक्षक पदावर काम करत असले तरी शिराढोण व परिसरातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना वेळोवेळी नेहमीच मदत करत आहेत. त्यांच्या या कार्यशैलीमुळे अनेक युवक त्यांच्या नेहमीच संपर्कात आहे. रक्तदानाच्या आवाहनानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळेच जिल्ह्यात आजवर अन्य ठिकाणी झालेल्या शिबिराच्या तुलनेत शिराढोण येथे सर्वाधिक रक्तदान झाले.