पुणे : शहराच्या हद्दीलगतची २३ गावे महापालिकेत समाविष्ट केल्याने तेथील अनेक इच्छुकांना महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याचे वेध लागले आहेत. मात्र, ही निवडणूक २०११च्या जनगणनेनुसार होणार असल्याने फक्त दोन नगरसेवकांची संख्या महापालिकेत वाढणार आहे.

राज्य सरकारने २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्याची अधिसूचना काढली आहे. या गावांचा विकास आराखडा ‘पीएमआरडीए’ कडून होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सध्या महापालिकेच्या कचरा, पाणी पुरवठा, विद्युत, मिळकतकर विभागाकडून कामकाज पाहिजे जात आहे. २३ गावे महापालिकेत आल्याने याचा फायदा कोणत्या राजकीय पक्षाला होईल, यावर चर्चा रंगात आलेली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने या गावांमध्ये जनसंपर्क ठेवण्यासाठी व संघटनात्मक बांधणीसाठी एक गाव एक नगरसेवक नियुक्त केला आहे. तसेच समाविष्ट गावांमधील आजी- माजी लोकप्रतिनिधी यांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे.

अधिक वाचा  काँग्रेस नेत्यांचं प्रत्युत्तर; ममतांसह विरोधकांना हा सल्ला

अनेक इच्छुकांनी गावामध्ये महापालिका निवडणुकीची तयारीदेखील करण्यास सुरवात केली आहे. २३ गावे महापालिकेत आली, तेथे सध्याची लोकसंख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढेल आणि महापालिकेतील गणित त्यावर ठरेल असेही सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र, सध्याच्या लोकसंख्येचा आणि नगरसेवकांची संख्या वाढण्यावर काहीही फरक पडणार नाही.

मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमातील २०१६च्या सुधारित तरतुदीनुसार ३० लाख लोकसंख्येसाठी १६१ नगरसेवकांची संख्या निश्‍चीत केली आहे. त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक निवडला जातो. २०११ मध्ये पुण्याची लोकसंख्या ३१ लाख इतकी होती. त्यामुळे एका नगरसेवकाची भर पडून एकूण १६२ नगरसेवकांची पदे निर्माण झाली. २०१७ मध्ये ११ गावे महापालिकेत आली, या गावांची लोकसंख्या दीड लाख असल्याने तेथून दोन नगरसेवक निवडण्यात आले. अशा प्रकारे सध्या पुणे महापालिकेत १६४ नगरसेवक आहेत.

अधिक वाचा  पराग अग्रवाल ट्विटरचे नवे CEO ; एकमताने निवड जॅक डोर्सी पायउतार

तेवीस गावांची लोकसंख्या १.९० लाख

महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांची २०११ च्या जनगणनेनुसार १ लाख ९० इतकी लोकसंख्या आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार ३० लाखांच्या पुढील प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे एक नगरसवेक वाढतो. त्यानुसार २३ गावांमधून दोन नगरसेवक निवडून महापालिकेत जाणार आहेत.

प्रभाग रचनेबाबत सूचना नाही

महापालिकेने निवडणूक शाखेचे अधिकारी म्हणून अजित देशमुख यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, या शाखेकडून शहरातील नवे प्रभाग किंवा वॉर्ड रचना निश्‍चि‍त होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीबाबत आयोगाकडून अद्याप कोणतीही सूचना मिळालेली नसल्याने सध्या याबाबत कार्यवाही केली जात नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.