मुंबई : राज्यातील 8 जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि महापुराने थैमान घातलं आहे. दुसरीकडे रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापुरातील महापुराचं पाणी ओसरायला आता सुरु झालं आहे. मात्र, झालेलं नुकसान न भरुन येणारं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी दोन दिवसांत संपूर्ण राज्याचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकार मदत जाहीर करेल, अशी ग्वाही दिली आहे. त्याचबरोबर उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावाच्या पुनर्वसनाबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

आढाव्यानंतर दोन दिवसांत मदत जाहीर होणार

राज्याला पुराचा मोठा फटका बसला. या पुरामुळे घरांचं, शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. राज्यात सात आठ जिल्यात पूरस्थिती आहे. कोकणात घरांचं नुकसान झालंय. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. माती वाहून गेलंय. सहा जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान झालं आहे. राज्य सरकार त्यांच्या कार्यक्रमानुसार मदत करेल. काही तातडीची मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे. आढाव्यानंतर राज्य सरकार आणखी मदत जाहीर करेल अशी खात्री आहे.

अधिक वाचा  आळंदीला चाललेल्या पायी दिंडीत पिकअप शिरल्याने अपघात.

तळीये गावाचं पुनर्वसन करावं लागेल

दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात माळीण गावात अशीच परिस्थिती झाली होती. त्यावेळी सरकार आणि जनतेच्या मदतीने गाव पुन्हा उभं केलं. पुनर्वसन कसं करतात त्याचं उदाहरण आहे. त्या अनुषंगाने डोंगर कडा कोसळून उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावाचंही पुनर्वसन केलं जाईल, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

पूरग्रस्त कुटुंबांना 16 हजार किट वाटणार

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून मदत देणार. 16 हजार किट तयार करणार. यामध्ये घरगुती भांडी, दोन प्लेट, दोन पेले, दोन वाट्या, दोन शिजवायची भांडी, एक तवा, एक चमचा, पोळपाट लाटणे असं किट राष्ट्रवादीने तयार केलं आहे. ते 16 हजार कुटुंबाला देणार. कोरोना प्रतिबंधासाठी मास्कचंही वाटप केले जातील. राष्ट्रवादी काँग्रेसचा वैद्यकीय विभाग आहे, त्यांची 250 डॉक्टरांची टीम पूरग्रस्त भागात जाऊन तपासणी करतील, औषधं देतील. गंभीर आजारी रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार केले जातील, असंही पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

अधिक वाचा  शाळेची घंटा एक डिसेंबरपासून वाजणार....

संबंध नसलेल्या नेत्यांनी आपत्तीचे दौरे टाळा

माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या भूकंपा वेळचा अनुभव आहे. अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे अनावश्यक दौरे टाळावे. मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल, मला आनंद आहे, माझी विनंती मान्य केली ते दहा दिवसानंतर आले. कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे होत आहेत त्याने धीर मिळतो . पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळं यंत्रणेला त्रास होतो, असं शरद पवार म्हणाले.

अधिक वाचा  ५०/५० ही पुडी.....हे तर पाच वर्षे पद; राऊत

केंद्राने राज्याला मदत करावी

राज्यावरील आपत्ती मोठी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याला मदत करावी अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपत्तीग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर जात आहेत. त्यांचे केंद्राचे संबंध चांगले आहेत‌, ते जास्त मदत आणू शकतात, असंही पवार यावेळी म्हणाले.