पुणे – गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार नीलेश आरते व सौरभ चौधरी यांनी पॅरोलवर बाहेर असताना कट रचून आखाडे यांचा खून केला. हा खून करण्यासाठी सौरभ याने नीलेश याला अल्पवयीन मुलाचा वापर करण्यास सांगितले होते. त्यानुसार अल्पवयीन मुलाला हाताशी धरून हा खून करण्यात आला आहे, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे.

संबंधित अल्पवयीन मुलाला लोणी-काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच नीलेश याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश आणि सौरभ यांची येरवडा कारागृहात ओळख झाली होती. पॅरोलवर सुटल्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. आरोपीच्या घरझडती दरम्यान येरवडा जेलमधील एका आरोपीने आणखी एक मोठे कांड करण्याचा आहे, असा मजकूर असलेले पत्र मिळाले आहे, अशी माहिती सरकारी वकील संजय दीक्षित यांनी सोमवारी न्यायालयास दिली.

अधिक वाचा  'स्वारद' फाऊंडेशन तर्फे भव्य किर्तन महोत्सव; मान्यवरांची सुश्राव्य कीर्तने

बाळासाहेब खेडेकर (वय ५६), निखिल खेडेकर (वय २४), सौरभ ऊर्फ चिम्या चौधरी (वय २१), अक्षय दाभाडे (वय २७) करण खडसे (वय २१), प्रथमेश कोलते (वय २३), गणेश माने (वय २०), निखिल चौधरी (वय २०, सर्व रा. हवेली) यांनी यापूर्वी अटक करण्यात आली आहे. सोमवारी सर्व नऊ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरते, चौधरी, खेडेकर, माने, खडसे, दाभाडे यांच्यावर हडपसर, लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

या बाबींचा होणार तपास –

गुन्ह्यात आणखी दोघांना अटक करण्यात आली असून अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे. पुराव्याची साखळी तयार करायची आहे. नेमका कशा प्रकारे कट रचला गेला?, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली?, गुन्ह्यातील हत्यारे कोठून आणली?, नव्याने अटक केलेला आरोपी आणि अल्पवयीन मुलाला पळून जाण्याचा कोणी मदत केली?, या आरोपींचा इतर कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का?, याचा तपास करण्यासाठी आरते याला पोलिस कोठडी व इतरांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. पाटील यांनी आरोपींना २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.