मुंबई: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २०१९च्या शेवटाला पदाची शपथ घेत कार्यभार सांभाळला. त्यांच्या कामाची शैली समजेपर्यंत कोरोनाने देशात आणि जगात थैमान घातले. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशात वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला. वर्षभरानंतर कोरोनाचा प्रभाव कमी झाला आणि नेतेमंडळी विविध जिल्ह्यांचे दौरे करू लागले. तरीही मुख्यमंत्री अद्याप घरात राहूनच जास्तीत काम करत आहेत. त्यामुळे त्यांना सतत विरोधकांना तोंड द्यावे लागते. मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या विरोधकांना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खोचक उत्तर दिले.

दिंडोशी येथील महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलचे उदघाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाले. या शाळेत एसएससी बोर्डाच्या वर्गासह सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. या उद्घाटनानंतर पत्रकारांनी त्यांना मुख्यमंत्र्यांवर होणाऱ्या टीकेबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले,”विरोधकांच्या टीकेवर लक्ष द्यायचं नसतं. कारण विरोधकांनी केलेल्या टीकेकडे लक्ष देत बसलं तर मग कोणताही माणूस नियोजित समाजहिताचे काम करूच शकणार नाही. सध्या जी परिस्थिती लोकांवर आली आहे, अशा परिस्थितीत राजकारण न खेळता राजकरणापलिकडे जाऊन काम करण्याची गरज आहे. लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे!”

अधिक वाचा  पाणी कपातीचा विचार नाही; उलट फडणवीसांच्या काळातच पाणी कपात झाली!

कोविड काळात मुख्यमंत्री घराबाहेर पडले नाहीत. कोकण पश्चिम महाराष्ट्राला वादळाचे तडाखे बसले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या विभागांचा धावता दौरा केला. तसेच, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतरही मुख्यमंत्र्यांनी झटपट स्वरूपाचा दौरा केला. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले.