पुणे: गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहा:कार उडाला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 76 लोकांचा मृत्यू झाला आहे. विविध दुर्घटनेत आतापर्यंत 59 लोक बेपत्ता आहेत. तर 90 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. या दुर्घटनांमध्ये माणसंच नाही तर जनावरेही दगावली आहेत. आतापर्यंत विविध दुर्घटनेत 75 जनावरे दगावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

अजित पवार यांनी पावसामुळे राज्यात गेल्या आठवड्याभरापासून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. कोल्हापूर, रायगड, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, सातारा सांगली, मुंबई उपनगरे असे नऊ जिल्हे अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात 209, सांगली 92, सातारा 120 आणि पुण्यात 421 गावे बाधित झाली आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अधिक वाचा  काँग्रेसशिवाय आघाडी ही मोदींना मदतच; चव्हाणांचा निशाणा

तळीये दरड प्रवण क्षेत्रात नाही

रायगड जिल्हा प्रशासनाने दरड प्रवण क्षेत्रांची यादी तयार केली होती. ज्या 9 गावांना दरड कोसळण्याचा प्रचंड धोका आहे, त्या गावांच्या यादीत तळीयेचा समावेश नव्हता. तसेच दरड कोसळण्याची शक्यता, सौम्य शक्यता असणाऱ्या गावांच्या यादीतही तळीयेचा समावेश नव्हता. तळीये हे दरड प्रवण क्षेत्रात येत नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.

दरडी कुठे कुठे कोसळल्या?

राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. साताऱ्यातील वाई तालुक्यात कोंडविडे आणि मौजेघर, महाडमध्ये तळीये, पोलादपूरमध्ये साखर सुतारवाडी आणि केवनाळे आणि पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबर्ली आणि ढोकवळी येथे दरडी कोसळल्या आहेत. घाटातही दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे घाट बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर माती आल्याने ताबडतोब माती काढण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

अधिक वाचा  Rakhi sawant: 'माझ्या बॉडीचा हा पार्ट खोटा'; 16 लाख किंमत

नुकसानीचा आकडा वाढला

माझ्याकडे आतापर्यंतची माहिती आली आहे. त्यानुसार मी आकडेवारी दिली. मात्र, अनेक ठिकाणी अजूनही पाऊस सुरू आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. पंचनामे झाल्यावर निश्चित आकडा येईल. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

लष्कर, नेव्ही, एनडीआरएफ कार्यरत

राज्यात एनडीआरएफची 21 पथके अनेक ठिकाणी बचाव कार्य करत आहे. नेव्ही, आर्मी, कोस्टगार्डचे 21 पथकेही कार्यरत आहेत. एसआरडीएफची प्रत्येकी दोन पथकं रायगड आणि नागपूरमध्ये कार्यरत आहेत. तर एनडीआरएफची 48 तर एसडीआरएफच्या 11 बोटी पूरस्थितीच्या कार्यात तैनात आहेत.

खिचडीसाठी तांदूळ, डाळ देणार

आपत्तीच्या काळात आपण नागरिकांना गहू, तांदूळ आणि रॉकेल देतो. पण पावसात सर्व वाहून गेलेलं असतं. पीठ गिरण्याही बंद असतात. त्यामुळे आपत्तीग्रस्तांना तांदूळ, रॉकेल आणि डाळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना तात्काळ खिचडी बनवून खाता येईल. तसेच एनजीओच्या मदतीने शिवभोजन केंद्र सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बिपिन रावत गंभीर; 11 मृत्यू

विविध दुर्घटनातील मृतांचा आकडा

रायगड- 47         सातारा- 6       मुंबई उपनगर- 4      पुणे- 1
रत्नागिरी-11       कोल्हापूर- 5         सिंधुदुर्ग- 2     एकूण-76

बेपत्ता नागरिकांचा आकडा
रायगड- 53  ठाणे- 2   सातारा- 4    एकूण- 59

जखमी-38

मृत जनावरांचा आकडा
रायगड- 33   कोल्हापूर- 3    सातारा- 25
सांगली- 8    पुणे- 6         एकूण- 75

90 हजार लोकांचं स्थलांतर
रत्नागिरी- 1200  कोल्हापूर- 40,882 सांगली- 42,573  ठाणे- 2681
रायगड- 1000  सातारा- 734  पुणे- 263   एकूण: 90, 000