मुंबई : कोकणात जोरदार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पुराने, झालेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं झालंय. कोकणची साधी भोळी माणसं उन्मळून पडलीत. कालपर्यंत समृद्ध असणारी माणसं आज संकटात सापडलीत. रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल 40 लोकांना जीव गमवावा लागला.

चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रिय मंत्री नारायण राणे कोकण दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय. फडणवीस-दरेकर साथीला असणार आहेत, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

मोदींच्या संमतीने दौरा, माझ्या साथीला-फडणवीस दरेकर

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत, असं ट्विट नवनिर्वाचित केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी केलं.

अधिक वाचा  लोकशाही झुंडशाहीला आवर न घातल्यास संपेल!; निवृत्त न्यायमूर्ती चपळगावकर

उद्धव ठाकरे-राणे-फडणवीस-दरेकर एकाच वेळी चिपळूणमध्ये

रायगडच्या तळीये गावच्या विदारक परिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री आज चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांचाही आज कोकण दौरा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर एकाच दिवशी चिपळूणची पाहणी करणार आहेत.

राणे-फडणवीसांचा दौरा कसा असणार?

सकाळी 10 वाजता हेलिकॉप्टरने मुंबईवरुन महाडकडे रवाना
दुपारी 12 वाजता रायगडवरुन खेडकडे प्रयाण
दुपारी 1 वाजता खेडवरुन चिपळूणकडे प्रयाण व पाहणी

अधिक वाचा  महापालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर

चिपळूणमध्ये महापुरानं हाहा:कार

चिपळूणमध्ये महापुरानं हाहा:कार माजला आहे. संपूर्ण बाजारपेठ, एसटी स्टॅन्ड, शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं आतोनात नुकसान झालं आहे. पाणी ओसरल्यानंतर आता नागरिकांकडून साफसफाई केली जात आहे. मात्र, ते करत असताना आपलं सर्वस्व गमावल्याचं चिपळूणकरांना पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री 11.30 वाजता चिपळूणमध्ये

अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूणच्या पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री चिपळूणला पोहोचतील. तिथे चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाची पाहणी ते करतील चिपळूणची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत.