पुणे – शहरातील कचरा घरोघरी जाऊन गोळा करणारे, रस्ते स्वच्छ करणाऱ्या कचरावेचकांना कोरोनाचा धोका आहे, पण हेच कचरा गोळा करणारे ‘हात’ लसीकरणापासून वंचित आहेत. गेल्या सात महिन्यांत केवळ ७ हजार जणांनी पहिला डोस घेतला आहे, तर तीन हजार कचरावेचकांचा एकदेखील डोस झालेला नाही. लसीकरण केंद्रावर गेल्यास वशिला नसल्याने त्यांना पिटाळून लावले जात आहे. ऑनलाइन बुकिंग करता येत नाही, अशा कात्रीत सापडल्याने, त्यांचे लसीकरण होत नाही. तर दुसरीकडे लशीबद्दल अज्ञानातून निर्माण झालेल्या गैरसमजातून लसीकरणाकडे पाठ फिरवली जात आहे.

शहरात रोज २१०० टन कचरा तयार होतो. हा कचरा घरोघरी जाऊन गोळा करण्यासाठी महापालिकेचे सुमारे ६ हजार ७२२ तर स्वच्छ संस्थेचे साडेतीन हजार कचरावेचक कार्यरत आहेत. कोरोना काळातदेखील हे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत होते. शहराचे आरोग्य राखणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा जीव मात्र सध्या धोक्यात आहे. जानेवारी महिन्यापासून लसीकरण सुरू करण्यात आलेले असले तरी गेल्या सात महिन्यांत कचरा वेचकांचे लसीकरण पूर्ण होऊ शकलेले नाही. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक केंद्रावर आरक्षित डोस आहेत, पण केंद्रावर गेल्यानंतर लस उपलब्ध नाही, नगरसेवकांचा वशिला आणा असे सांगितले जाते. त्यामुळे कचरावेचक कर्मचारी, महिलांना माघारी फिरावे लागत आहे.

अधिक वाचा  पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रं, मग शिवरायांचं कर्तृत्व का नाही? - अमोल कोल्हे

कचरावेचकांना लसीकरणात अडथळा येत असल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाने आतापर्यंत दहा ठिकाणी लसीकरण मोहीम आयोजित करून सुमारे तीन हजार जणांचे लसीकरण केले. त्यामुळे महापालिका व ‘स्वच्छ’च्या ७ हजार ५८ जणांचा पहिला डोस झाला आहे. त्यापैकी महापालिकेच्या १ हजार ३९६ जणांनी दुसरा डोस घेतल्याने त्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ‘स्वच्छ’कडील कचरावेचकांचे दोन्ही डोस घेण्याचे प्रमाण फक्त ३ टक्के असल्याचे समोर आले आहे. अद्यापही तीन हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण बाकी आहे.

लसीकरणाबाबत भीती

एकीकडे लसीकरण व्हावे म्हणून प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लशीबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. विशेषतः महिला लसीकरणापासून लांब राहत आहेत. त्यांचे समुपदेशन करून लसीकरण करून घेण्यावर महापालिकेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेचे कायम, कंत्राटी व ‘स्वच्छ’चे कचरावेचक यांच्यासाठी १० ठिकाणी लसीकरण मोहीम घेतली होती. लसीकरणाबद्दल असलेल्या गैरसमजामुळे काही जण लस घेणे टाळत आहेत, अशांचे समुपदेशन केले आहे.

अधिक वाचा  पाणी कपातीचा विचार नाही; उलट फडणवीसांच्या काळातच पाणी कपात झाली!

                                                     – डॉ. केतकी घाटगे, सहायक वैद्यकीय अधिकारी, घनकचरा विभाग

आमचा घरकचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या मावशींना मी ऑनलाइन लस बुकिंगसाठी मदत केली. कचरावेचक घरोघरी जातात, त्यांना कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे याबाबत गांभीर्याने नियोजन व्हावे.

                                                       – अनिकेत राठी, परिवर्तन संस्था