मागील चोवीस तासांपासून बेफाम कोसळणारा पाऊस, अंगणातील पाणी घरात घुसल्यानं विझलेल्या चुली, कष्टानं घेतलेली वाहनं काही क्षणांत पाण्याखाली गेली. व्यापारपेठा बुडाल्या, दुकानांमध्येही पाणी शिरलं. जीव मुठीत घेऊन लोकं छपरांवर गेली. काहींनी गुरंढोरं वाहनांत बसवून सुरक्षितस्थळी धाव घेतली. डोंगरांच्या कुशीत वसलेल्या टुमदार गावांवर तर काळानं घालाच घातला. पाठीशी उभे असलेले डोंगर, दरडी काळ बनून कोसळल्या अन्‌ काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं. यामध्ये 90 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

कोसळणाऱ्या दरडींमुळं कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्र जायबंदी झाला आहे. कोल्हापूर, सातारा अन् सांगलीला पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला असून पुण्याच्या घाटमाथ्यावरही जोरधार सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

वारणा, कृष्णा नदीकाठावर हाहाकार

सांगली – गेली दोन दिवस चांदोली व कोयना धरण पाणलोटात मुसळधार पाऊस सुरु आहे. वारणा तसेच कृष्णा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाने नदीकाठावरील १०४ गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात ‘एनडीआरएफ’ ची दोन पथके दाखल झाली आहे. महापूरामुळे जिल्ह्यातील ३७ मार्गावरील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. शनिवारी दुपारपर्यंत पाण्याची पातळी ५० फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. शहर व जिल्ह्यातील दहा हजारावर लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यात गरजेच्या ठिकाणी निवारा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. वारणा व कोयना पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव, तासगाव तालुक्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे.

अधिक वाचा  अनिल अंबानी अडचणीत? रिझर्व बँकेने सुरू केली कायदेशीर प्रक्रिया

कोल्हापूरचा श्वास कोंडला!

कोल्हापूर – जिल्ह्यात महापूर आला असून पंचगंगेची पाणी पातळी शुक्रवारी सायंकाळी सातच्या दरम्यान ५४.१ इतकी होती. जिल्ह्यात पावसाचे थैमान सलग चौथ्या दिवशीही कायम होते. जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी आठ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. कोनोली तर्फ अंसडोली पैकी कुपलेवाडी (ता. राधानगरी) येथे मुसळधार पावसाने भूस्खलन होऊन दोन घरे गाडली गेली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. चार जनावरेही दगावली. गुरुवारी (ता. २२) रात्री अकरा वाजता घटना घडली.

पंचगंगेच्या पाण्यामुळे पुणे-बंगळूर महामार्गावरील येथील सेवा रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. पाणी घुसल्यामुळे किंवा साचल्यामुळे शहरातील अनेक रस्ते बंद झाले आहेत. नाशिककडे जाणाऱी खासगी आरामबस भुदरगड तालुक्यात पाण्याच्या दाबाने वाहून गेली असून त्यामधील ११ प्रवाशांना सुखरूप काढण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. मध्यरात्री ही घटना घडली. कोल्हापुरातून पन्हाळा रस्त्यावरून रत्नागिरीला जाणारी बस रजपूतवाडी जवळ पाण्यात फसल्यामुळे धोक्यात असलेल्या २५ प्रवाशांना आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवानांनी सुखरूप बाहेर काढले. एनडीआरएफच्या तीन तुकड्या जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यरत आहेत. महापुराची स्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

अधिक वाचा  'स्वारद' फाऊंडेशन तर्फे भव्य किर्तन महोत्सव; मान्यवरांची सुश्राव्य कीर्तने

खेड तालुक्यात दरडींचे संकट; तीन मृतदेह सापडले

रत्नागिरी – अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्याला बसला. चिपळूणवासीयांनी ४८ तास जलप्रलयात काढले असून आज सुमारे दीड हजार लोकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यात यश आले. खेडमध्ये पाच गावात दरडी कोसळल्या. पोसरेत वीसहून अधिक लोक गाडली गेली. मुसळधार पावसाचा तडाख्यामुळे खेड तालुक्यातील पोसरे-धामणंद बौद्धवाडी येथे दरड कोसळल्यामुळे सात कुटुंबातील १७ जण तर २४ जनावरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तिघांचे मृतदेह सापडले असून उर्वरित लोकांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दहा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिपळूण तालुक्यातील आत्तापर्यंत सुमारे दीड हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्याठिकाणी भोजन, पाणी व निवासाची व्यवस्था प्रशासनामार्फत केली आहे.

अधिक वाचा  एकावर एक फ्री थाळी चांगलच महागात; तब्बल ८९ हजारांचा ग्राहकाला गंडा

सिंधुदुर्ग जिल्हा पावसाने दोन महिलांचा बळी

वैभववाडीः सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हाहाकार आजही सुरूच होता. यामुळे अनेक भागात पूरस्थिती कायम आहे. पावसाने दोन महिलांचा बळी घेतला आहे. प्रशासनाने आतापर्यत एक हजार २७१ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. शेकडो घरे, इमारती पुराच्या वेढ्यात असून पडझडीने कोट्यवधींची हानी झाली आहे. पावसाचा तडाखा घाटरस्त्यांना देखील बसला आहे. खारेपाटण, बांदा या बाजारपेठांमध्ये रात्री उशीरापर्यंत आठ ते दहा फुटापर्यंत पाणी होते. जिल्ह्यात काही भागात डोंगर खचण्याचे प्रकार घडले. ‘एनडीआरएफ’ची दोन पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत.