सातारा : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून अनेक भागात ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड भागात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच साताऱ्यातील पश्चिम भागात मोठा पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे जवळपास 75 पेक्षा अधिक गावाचा संपर्क तुटला आहे. महाबळेश्वरच्या इतिहासात प्रथमच गेल्या 24 तासात 594 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे धावरी गावातील दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात अंकुश मारुती सपकाळ या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर महाबळेश्वर तालुक्यात 28 पेक्षा अधिक गावांमध्ये दरड, झाडे, खांब पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अधिक वाचा  धनुषला आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर

साताऱ्यात कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग?

कोयना धरणातून 54541 क्यूसेसने विसर्ग
धोम प्रकल्पातून 8711 क्यूसेसने विसर्ग
कणेर प्रकल्पातून 7219 क्यूसेसने विसर्ग
उरमोडी प्रकल्पातून 5 हजार 934 क्यूसेसने विसर्ग
तारळी धरणातून 12 हजार 255 क्यूसेसने विसर्ग
बलकवडी प्रकल्पातून 4 हजार 619 क्यूसेसने विसर्ग

साताऱ्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम

तर दुसरीकडे साताऱ्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. साताऱ्यात कोयना धरण परिसरात आतापर्यंत 2597 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर नवजाला 3427 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याशिवाय महाबळेश्वरमध्ये 3209 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.