नवी दिल्ली- इस्त्रायलची कंपनी एनएसओ ग्रुपच्या पेगॅसस स्पायवेअरने भारतात केलेली हेरगिरी चर्चेचा विषय ठरली आहे. यामुद्द्यावरुन सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. भाजपला घेरण्यासाठी काँग्रेसला चांगला मुद्दा मिळाला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पेगॅससचा वापर इस्त्रायलने शस्त्र म्हणून केला आहे. या शस्त्राचा वापर दहशतवाद्यांविरोधात केला जातो. पण, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी याचा वापर भारतीय राज्य आणि संस्थांविरोधात केला आहे. राफेल प्रकरणाचा तपास थांबवण्यासाठी पेगॅससचा वापर झाला.

अधिक वाचा  सुप्रीम कोर्टाची ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

मोदी-शहांनी देशद्रोह केला

राहुल गांधी संसदेजवळच्या विजय चौकाजवळ माध्यमांशी बोलत होते. पेगॅसस एक शस्त्र आहे ज्याचा वापर दहशतवादी आणि गुन्हेवारांविरोधात केला जातो. पण, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी याचा वापर भारतातील संस्था आणि लोकशाहीविरोधात केला आहे. माझा फोन टॅप करण्यात आला. हा माझ्या गोपनीयतेचा प्रश्न नाही. मी एक विरोधी पक्ष नेता आहे आणि लोकांचा आवाज उठवण्याचं काम करतो. हे जनतेच्या आवाजावरील आक्रमण आहे, असं राहुल म्हणाले.

राफेल प्रकरणाचा तपास थांबवण्यासाठी पेगॅससचा वापर करण्यात आला. त्यांनी याचा वापर सुप्रीम कोर्टाविरोधात केला. कर्नाटकात याचा वापर झाला. नरेंद्र मोदी यांनी या शस्त्राचा वापर आपल्या देशाविरोधात केला. यासाठी एकच शब्द आहे ‘देशद्रोह’, असंही राहुल गांधी म्हणाले. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पेगॅसस स्पायवेअरचा मुद्दा उचलून धरला आहे. भाजपने यावर उत्तर द्यावे, तसेच तपासासाठी समिती गठित करावी अशी मागणी केली आहे. पण, भाजपने सर्व प्रकारचे आरोप फेटाळून लावले आहेत.

अधिक वाचा  Omicronच्या प्रचंड धास्तीत; WHO कडून माहिती

राहुल गांधींच्या फोनची हेरगिरी?

देशात स्पायवेअरच्या माध्यमातून ज्यांच्यावर हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप आहे, त्यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान, 2019 मध्ये पेगॅसस प्रकरण उजेडात आलं होतं, त्यावेळी भारत सरकारने इस्त्रायलचे हे सॉफ्टवेअर वापर नसल्याचं म्हटलं होतं. आताही भारताने या प्रकरणी हात असल्याचा आरोप फेटाळला आहे. पण, विरोधकांनी मुद्दा तापवल्याने भाजपला या प्रकरणी उत्तर देणे कठिण जात आहे.