केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी शेतकऱ्यांप्रती केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. नवनियुक्त मंत्री मीनाक्षी लेखी यांनी आंदोलक शेतकरी मवाली असल्याचं विधान केल्याने वाद निर्माण झाला होता. शेतकऱ्यांचे आंदोलन गुन्हेगारी स्वरूपाचे असून २६ जानेवारी रोजी झालेला हिंसाचार लज्जास्पद आहे. विरोधी पक्ष या आंदोलनाला फूस देत असल्याचीही टीका लेखी यांनी केली होती.

मीनाक्षी लेखी यांनी माफी मागताना शेतकरी संसददरम्यान प्रसारमाध्यमांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं म्हटलं आहे. दिल्लीमधील जंतर मंतरमध्ये कृषी कायद्यांविरोधात आयोजित आंदोलनादरम्यान एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर हल्ला करण्यात आला होता.

अधिक वाचा  एसटी कर्मचाऱ्यांना संघटनांनी अडवू नये !; गुन्हे दाखल करण्यासही मुभा

पोलिसांच्या ‘देखरेखी’खाली २०० शेतकऱ्यांचे आंदोलन

“पत्रकार परिषदेदरम्यान २६ जानेवारीला लाल किल्ला येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तसंच शेतकर संसदरम्यान पत्रकारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माझं मत विचारण्यात आलं होतं. उत्तर देताना मी शेतकरी नाही तर फक्त मवाली अशा गोष्टी करु शकतात असं म्हटलं होतं,” असं स्पष्टीकरण मीनाक्षी लेखी यांनी दिलं आहे. “माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून यामुळे शेतकरी किंवा अन्य कोणी दुखावलं असेल तर मी माफी मागते आणि माझे शब्द मागे घेते,” असं मीनाक्षी लेखी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे.

“काही लोक माझ्यासोबत असभ्य भाषेत वर्तन करत असताना काहीजण व्हिडीओ शूट करत होते. भांडण झाल्यानंतर एका व्यक्तीने लाईट स्टँडने माझ्या डोक्यावर वार केला. त्याने तीन वेळा माझ्यावर हल्ला केला. त्याच्याकडे किसान मीडिया नावाचं एक ओळखपत्र होतं. तो शेतकरी होता की नाही माहिती नाही, मात्र त्याचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा होता हे दिसत होतं,” असं हल्ला झालेल्या पत्रकाराने म्हटलं आहे.

अधिक वाचा  इतिहासातील सर्वांत मोठी 41 टक्के वाढ; विलीनीकरणावर कर्मचारी ठाम

पत्रकार परिषदेत मीनाक्षी लेखी यांना याबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “ते शेतकरी नाही, तर मवाली आहेत. या गुन्हेगारी घटना आहेत. २६ जानेवारीलाही जे काही झालं तेदेखील लाजीरवाणं आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचं होतं. विरोधक अशा गोष्टींना फूस देत आहोत”.

लेखी यांच्या या विधानावर शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकरी गुंड वा मवाली नाहीत ते देशाचे अन्नदाते आहेत. लेखींनी आक्षेपार्ह विधाने करू नये, असे राकेश टिकैत म्हणाले.