पुणे : एकाच ठेकेदाराला वेगवेगळी कामे कशा प्रकारे दिली जातात, हे पाणीपुरवठा विभागाच्या निविदेच्या प्रकरणावरून उघड झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) देखभाल-दुरुस्तीचे काम ज्या ठेकेदाराला दिले, त्याच ठेकेदाराला जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीचे काम मिळावे, यासाठी निविदेतील अटी-शर्तींमध्ये बदल करण्याचा प्रकार अधिकाऱ्यांनी केला असल्याचे समोर आले.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने खडकवासला रॉ वॉटर पंपिंग स्टेशन, वारजे आणि वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्ती कामांच्या सुमारे ३८ कोटी रुपयांच्या तीन निविदा काढल्या आहेत. मर्जीतील ठेकेदारासाठी कशा पद्धतीने या निविदा प्रक्रियेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घोळ घातला. अधिक घातला, याची कागदपत्रे हाती आली आहेत.

अधिक वाचा  आंतरविभागीय हॉकी स्पर्धेत पुणे ग्रामीण संघ विजयी

नायडू आणि बाणेर येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी फेब्रुवारी महिन्यात १४ कोटी ९५ लाख रुपये किमतीच्या निविदा काढल्या होत्या. या कामाच्या निविदेतील अटी-शर्ती सेंट्रल व्हिजीलन्स कमिशनच्या (सीव्हीसी) निकषानुसार तयार केल्या होत्या. परंतु, कोणीही मागणी केली नसताना या निविदेतील अटी-शर्ती बदलल्या. त्यासाठी स्वतंत्र जाहिरात शुद्धिपत्रक काढून सीव्हीसीच्या अटी बदलून जलसंपदाच्या अटींचा समावेश केला. त्यानंतर हे कामे देण्यात आले.

नागपूर कनेक्शन

नायडू आणि बाणेर येथील प्रकल्पांसाठी ज्या ठेकेदार कंपनीने या निविदा भरल्या होत्या, त्यापैकी एका ठेकेदार कंपनीला वारजे जलशुद्धीकरण केंद्राचे काम मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या निविदांमध्ये घोळ घालण्यात आला. या दोन्ही कामांत नागपूर येथील ठेकेदार कंपनीच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

अधिक वाचा  सोन्याचे भाव महिना अखेरीस कडाडले; चांदीच्या दरात मात्र घसरणच

यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद उंडे यांनी सांगितले, ‘केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाची वर्क ऑर्डर गेल्या आठवड्यातच दिली आहे तर नायडू आणि बाणेर येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्राच्या देखभाल-दुरुस्ती कामांच्या निविदेतील अटी-शर्तीसाठी जलसंपदा विभागाचे निकष वापरले आहेत. जलसंपदा विभागाचे निकष वापरावेत, असा आदेश राज्य सरकारने गेल्यावर्षी काढला होता. त्यानुसार हा बदल करण्यात आला. त्यासाठी आयुक्तांची मान्यता घेतली आहे.’