पुणे – गुंड संदीप मोहोळ याच्या खूनप्रकरणात तिघांना जन्मठेप आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, 12 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सचिन पोटे, जमीर शेख, संतोष लांडे यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर, तिघांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला आहे. मोक्का न्यायालय न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा निकाल दिला.

टोळीच्या वर्चस्व वादातून गुंड संदीप मोहोळ याचा 4 ऑक्‍टोबर 2006 रोजी पौड फाटा येथे गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. यानंतर गुन्हे शाखेने गणेश मारणे, सचिन पोटे आणि इतर अशा 18 जणांना अटक केली होती. याप्रकरणी मोक्का, आर्म ऍक्‍ट, खून यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल होता. यात पांडुरंग मोहोळ, दिनेश आवजी आणि इंद्रनील मिश्री यांचा खटला सुरू असताना मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा  भारत- रशिया ५१०० कोटींचा सौदा; एके-२०३ रायफल्सचा UPमध्ये सुरु करणार कारखाना

तत्कालिन जिल्हा सरकारी वकील ऍड. उज्ज्वला पवार, ऍड. विलास पठारे यांनी काम पाहिले. तर आरोपींकडून ऍड. सुरेशचंद्र भोसले, ऍड. डॉ. चिन्मय भोसले, ऍड. सुधीर शहा, ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. एन. डी. पवार ऍड. ऍड. संदीप पासबोला, ऍड. राहुल वंजारी, ऍड. अतुल पाटील, ऍड. धैर्यशील पाटील, ऍड. जितेंद्र सावंत, ऍड. राहुल भरेकर, ऍड. विपुल दुशिंग यांनी बाजू मांडली.

न्यायालयीन कामासाठी आरोपींनी मागितली होती खंडणी

मारणे टोळीतील अनिल मारणे याचा 2005 मध्ये संदीप मोहोळ टोळीने खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी 2006 मध्ये संदीप मोहोळचा पौड रोड परिसरात खून करण्यात आला, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले. यातील दोन आरोपींनी न्यायालयाच्या कामकाजासाठी एका दुकानदाराकडे दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी खडक पोलिसांनी अनिल खिलारे व सागर खिलारे (42, रा. शुक्रवार पेठ) यांना अटक केली होती.