पुणे : पंधरा दिवसांची दडी मारल्यानंतर पुन्हा सक्रीय झालेला मान्सून काही भागात जोरदार कोसळत असल्याचं चित्र आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला असून ताम्हिणी परिसरात 24 तासात तब्बल 468 मिलीमीटर (468mm) पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये 468 पाऊस होत असला तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी होतं. मात्र हा पाऊस पाणलोट क्षेत्रातच पडला असल्यामुळे धरणात पाण्याची मोठी बेगमी झाली आहे.

ऐतिहासिक बेगमी

गेल्या 24 तासत धरण परिसरात 468 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे ऐतिहासिक 73 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी जमा झालं आहे. धरणाच्या जलाशयाच्या पातळीत तब्बल 7 फुटांनी वाढ झाली आहे. 24 तासांत झालेली ही ऐतिहासिक वाढ आहे. गायब झालेल्या पावसानं हजेरी लावल्यानंतर अचानक मुसळधार बरसायला सुरुवात केली. त्याचा परिणाम धरणाच्या पाणीपातळीवर झाला आहे.

अधिक वाचा  फेसबुक, गूगलचा जाहिरात महसूल सर्वाधिक; भारतीय माध्यमांपेक्षा १५ हजार कोटी रुपये अधिक

धरणाचा गुरुवारचा साठा २२० दलघमी असून टक्केवारी ३८.६०% आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असून अचानक पावसाचे प्रमाण वाढलं तरी काळजी करण्याची गरज नसल्याचं धरण प्रशासनानं म्हटलं आहे.

विक्रमी पाऊस

ताम्हिणी परिसरात बुधवारी झालेला पाऊस ऐतिहासिक असल्याचं सिद्ध झालं आहे. 26 जुलै 2005 नंतरचा सह्याद्रीच्या खोऱ्यातील हा सर्वात मोठा पाऊस असल्याची नोंद झाली आहे. ताम्हिणी घाटात झालेल्या या पावसानं 24 तासांतील पावसाचा गेल्या 15 वर्षातील उच्चांक नोंदवला आहे.

निसर्गाचा समतोल बिघडतोय

काही दिवसांपूर्वी चीनमध्येदेखील एका दिवसात वर्षातील दोन तृतीयांश पावसाची नोंद झाली होती. निसर्गाचा समतोल बिघडत असल्याचं हे लक्षण आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी दिली होती. चीन आणि भारत हे शेजारी देश असल्यामुळे हवामानातील बदलांचा परिणाम भारतालाही जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कधी पाऊस गायब होणे तर कधी एकाच दिवसात विक्रमी पाऊस पडणे, असे प्रकार नजिकच्या भविष्यात घडू शकतात, असा अंदाज हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.