अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपप्रकरणी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला सोमवारी गुन्हे शाखेने अटक केली. राजला अटक झाल्यापासून त्याने हा व्यवसाय कसा सुरू केला, ॲप्लिकेशनद्वारे लाखो रुपये कसा कमवायचा याबद्दलची माहिती समोर येऊ लागली आहे. ‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाउनदरम्यान राज कुंद्राचा हा पॉर्न व्हिडीओ बनविण्याचा व्यवसाय वाढला. राजने १८ महिन्यांपूर्वीच हा व्यवसाय सुरू केला होता. पण लॉकडाउनमध्ये व्यवसायाला मोठी चालना मिळाली आणि तो दररोज लाखो रुपये कमवू लागला, अशी माहिती सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे यांनी दिली. यासाठी राज कुंद्राने युकेमध्ये राहणारा मेहुणा प्रदीप बक्षीच्या केनरीन लिमिटेडशी भागीदारी केली.

अधिक वाचा  भारत- रशिया ५१०० कोटींचा सौदा; एके-२०३ रायफल्सचा UPमध्ये सुरु करणार कारखाना

“हॉटशॉट या ॲपवर भारतातून व्हिडीओ अपलोड करू शकत नसल्याने परदेशी कंपनीला व्हिडीओ पाठवण्याचा व्यवसाय सुरू केला. राजच्या ऑफिसमधून हे व्हिडीओ लंडनमधील केनरीन लिमिटेड या कंपनीले व्ही ट्रान्सफरद्वारे पाठवले जायचे”, असं भारांबे म्हणाले. हॉटशॉट ॲप बंद झाल्यानंतरही राज कुंद्राकडे ‘प्लॅन बी’ तयार होता. गुगल प्ले स्टोअर आणि ॲपलवर हॉटशॉट या ॲपवर गेल्या वर्षी बंदी आणण्यात आली. तेव्हा राजने ‘बॉलिफेम’ नावाचा दुसरा ॲप तयार करण्याचा विचार केला. राज कुंद्राच्या या प्लॅन बीसंदर्भातले व्हॉट्स ॲप चॅट्स गुन्हे शाखेला मिळाले आहेत.

अश्लील चित्रपटनिर्मितीच्या या व्यवसायातून सुरुवातीला राज दिवसाला दोन-तीन लाख रुपये कमवत होता. नंतर तो दिवसाला सहा ते आठ लाख रुपये कमवू लागला. “आम्ही कमाईचे अचूक तपशील मिळवण्यासाठी तपास करत आहोत. आतापर्यंत आम्ही त्याच्या वेगवेगळ्या खात्यातील साडेसात कोटी रुपये गोठवले आहेत”, अशी माहिती भारांबे यांनी दिली. अश्लील ॲप्लिकेशनची माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली आहे. कुंद्रा व थॉर्प दोघांनाही न्यायालायने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.