पुणे – ग्रामीण भागात तपासणी संख्या वाढवा, निर्बंधाची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दर शुक्रवारी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात येत होत्या. मात्र, बाधित दर कमी होत नव्हता. परंतु, या आठवड्याच्या बैठकीपूर्वी अचानक सहा ते साडेसहा टक्‍क्‍यांवर असलेला बाधित दर पाच टक्‍क्‍यांच्या आत आला आणि त्यानंतर पुन्हा तो साडेपाच ते सहा टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे.

विभागीय आयुक्‍त कार्यालयात दर शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना आढावा बैठक होते. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील बाधित संख्या झपाट्याने कमी झाली. मात्र, ग्रामीणमध्ये बाधित संख्या कमी होण्याएवजी वाढत गेली. त्यामुळे प्रत्येक बैठकीमध्ये आरोग्य विभागाच्या कामावर नाराजी व्यक्‍त करत, बाधित दर कमी करण्यासाठी ठोस पावले उचला, हलगर्जीपणा करू नका अशा सूचना देण्यात येत होत्या. या वारंवारच्या सूचनांमधून दिलासा मिळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या दिवशी बाधित दर कमी झाला का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

अधिक वाचा  "पवारांना अडकवण्याचाच ममतांचा डाव, काँग्रेसविरोधातही कट सुरूच"

15 जुलै रोजी ग्रामीणमधील बाधित दर 4.32 टक्‍के होता. तर बैठकीनंतर तो थेट 5.97 टक्‍क्‍यांवर पोहोचला. त्यानंतर एक दिवस सोडला तर, दररोज ग्रामीणमधील बाधित दर साडेपाच टक्‍क्‍यांच्या पुढे आहे. आजही बाधित दर सहा टक्‍क्‍यांच्या घरात आहे. त्यामुळे नेमका बैठकीच्या दिवशीच बाधित दर पाच टक्‍क्‍यांच्या आत कसा असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. आजही शहरापेक्षा ग्रामीणमध्ये सर्वाधिक 557 बाधित संख्या आहे. तर 2 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. 9 हजार 345 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली.