पुणे – महापालिकेची निवडणूक सहा महिन्यावर येऊन ठेपली आहे, या निवडणुकीत आपल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करायचे आहे. महिना अखेर पर्यंत शहरातील सर्व शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या पूर्ण करून संघटनात्मक कामाला सुरवात करा, माजी नगरसेवकांनी देखील संख्याबळ वाढविण्यासाठी कंबर कसली पाहिजे असे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिले.

मनसेच्या संघटनात्मक बैठकांचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे हे तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. आज दुसऱ्या दिवशी त्यांनी एनआयबीएम रस्त्यावरील लोणकर लॉन्स येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनसे नेते अनिल शिरोदे, बाबू वागस्कर, सरचिटणीस किशोर शिंदे, हेमंत संभूस, महापालिकेतील गटनेते साईनाथ बाबर आदी यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  ४ डिसेंबरला का साजरा केला जातो? भारतीय नौदल दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्व

आजच्या बैठकीत शहरातील प्रभाग अध्यक्ष, उप विभाग अध्यक्ष यांच्यासह माजी नगरसेवक, विधी सेनेचे सदस्य व मनसेच्या इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांनी संवाद साधला. या बैठकीत प्रथमच मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठी तयार केलेल्या ‘महाराष्ट्र सैनिक’ हे बॅच वाटप केले. तर शाखा प्रमुखांसाठी ‘राजदूत’ नावाचे बॅच तयार केले जाणार आहेत.

मनसेतील प्रभाग अध्यक्ष हे पद रद्द केले आहे, यापुढे आता शाखा अध्यक्ष हे पद असेल. शहरातील प्रत्येक वॉर्डात मनसेचा शाखा अध्यक्ष व आणि प्रत्येक चौकात झेंडा असला पाहिजे. माजी नगरसेवकांनी देखील आत्तापासूनच कामाला लागा, पुढील निवडणुकीत २९ पेक्षा जास्त नगरसेवक महापालिकेत गेले पाहिजेत. शाखा प्रमुखांची नियुक्ती जुलै अखेर पर्यंत पूर्ण करा, जो चांगले काम करणार त्याच्या घरी मी जेवायला येणार हे असेही ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले.

अधिक वाचा  भाजपवाल्यांच्या माझ्याकडे सीडी, लावल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही : मलिक

‘राज ठाकरे यांनी आज १९ माजी नगरसेवक, प्रभाग अध्यक्ष, उप विभाग अध्यक्ष, विधी सेना व इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी महापालिका निवडणुकीत २९ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणायचे आहेत, त्यादृष्टीने सर्वांनी तयारी करा असे आदेश दिले आहेत.’

                                       – वसंत मोरे, शहराध्यक्ष, मनसे

बाबासाहेब पुरंदरे भेट

पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन, प्रकृतीची चौकशी केली. तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील लिखाणावर देखील दोघांमध्ये चर्चा झाली.