पुणे – केंद्र सरकारकडून महापालिकेला कोव्हीशील्ड लसीचा पुरवठा होत नसल्याने गेल्या चार दिवसांपासून शहरातील जवळपास २०० पेक्षा जास्त केंद्र बंद आहेत. महापालिकेकडून लसीकरण कधी सुरू होणार अशी नागरिक चौकशी सुरू करत आहेत. पण लस उपलब्ध नसल्याने व ती कधी येणार हे माहिती नसल्याने महापालिकेचीही कोंडी झाली आहे. तर नागरिक हवालदिल झाले आहेत.

शहरात महापालिकेच्या केंद्रांवर मोफत आणि खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरण सुरू केले जात आहे. केंद्र सरकारने १८ च्या पुढील सर्व वयोगटासाठी लसीकरणासाठी शासकीय केंद्रांवर मोफत लसीकरण केले जाईल असे जाहीर केले आहे. पुण्यामध्ये महापालिकेने सुमारे २०० केंद्र शाळा, विरंगुळा केंद्र, महापालिकेचे दवाखाने, रुग्णालयांमध्ये सुरू केले आहेत. यातील बहुतांश ठिकाणी कोव्हीशील्ड लस पुरविली जाते. तर केवळ सहा ठिकाणी कोव्हॅक्सीन लसीचे केंद्र आहेत. या केंद्रावर प्रत्येकी ३०० डोस पुरविले जात आहेत.

अधिक वाचा  आंतरविभागीय हॉकी स्पर्धेत पुणे ग्रामीण संघ विजयी

महापालिकेला गेल्या आठवड्यात शुक्रवारी १५ हजार डोस उपलब्ध झाले होते. त्याद्वारे शनिवारी लसीकरण करण्यात आले. रविवारी सर्व लसीकरण केंद्रांना सुट्टी देण्यात आली होती. रविवारी सायंकाळी लस उपलब्ध झाली असती तर सोमवारी लसीकरण सुरू होईल असा अंदाज महापालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र, कोव्हीशील्डचे डोस उपलब्ध झाले नसल्याने सोमवार, मंगळवारी लसीकरण झाले नाहीच, पण आता बुधवारी देखील कोव्हीशील्डचे लसीकरण बंद आहे.

अनेक नागरिकांचा पहिला डोस होऊन ८४ दिवस उलटून गेले आहेत, या नागरिकांना तुमचा दुसरा डोस या दिवशी होणार असा मेसेज देखील येत आहे. पण शहरातील लसीकरण ठप्प असल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत. घराजवळील महापालिकेचे कार्यालय, रुग्णालय, नगरसेवकाचे कार्यालय येथे जाऊन चौकशी करत आहेत. पण लस केव्हा उपलब्ध होणार याची माहिती नागरिकांना मिळत नसल्याने ते संताप व्यक्त करत आहेत. काही नागरिकांनी खासगी दवाखान्यात जाऊन सशुल्क लसीकरण करून घेतले. गेल्या दोन दिवसात खासगी रुग्णालयात सुमारे १५ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

अधिक वाचा  राऊतांचे सध्याचे नेते सोनिया, राहुल आणि प्रियंका - फडणवीस

दरम्यान, लस कधी उपलब्ध होणार याबाबात माहिती नाही, उपलब्ध झाली की लसीकरण सुरू करू असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.