मुंबई – देशातील अनेक भागांत आता कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरली आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोरोना नियंत्रणात आला असला तरी काही शहरे आणि ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे.

या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय पथकाने महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरचा दौरा केला आहे. राज्यात सध्या या दोन जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक असून, केंद्रीय पथकाने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची शिफारस केली आहे.

केंद्रीय पथकाने सांगली आणि कोल्हापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात येत असलेल्या पावलांनंतरही संसर्ग वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. तर राज्याच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना अद्यापही केंद्रीय पथकाच्या सदस्यांकडून येणाऱ्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले.

अधिक वाचा  बार्बाडोस प्रजासत्ताक; ब्रिटनच्या राणीचा ४०० वर्षांचा अंमल संपला

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये १० असे जिल्हे आहेत तिथे अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट अधिक आहे. केंद्रीय पथकाने या जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचा दौरा केला आहे. तसेच येथील कोरोना टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि लसीकरणासारख्या उयाययोजना उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. आम्ही सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहोत, असेही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मी लवकरच दिल्लीला जाणार आहे. यादरम्यान मी राज्य सरकारकडून कोरोना लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे मागणी करणार आहे. तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे संचालक डॉ. सुजित सिंह यांनी राज्याचे प्रशासन या भागात कोरोनाचा कुठला व्हेरिएंट तर नाही ना याचा तपास करत आहेत, असे सांगितले.