पुणे : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी येत आहे. हा योगायोग असला तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. मात्र ऐकतील ते कार्यकर्ते कसे? पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी करत एकमेकांना आव्हान दिले आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पावधी सरकारच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. आणि आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या उंबरठ्यावर पुण्यात फडणवीस आणि पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीकडून जोरदार ‘पोस्टरबाजी’ द्वारे शक्तिप्रदर्शन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा  समुद्रपातळीत तिप्पट वाढ; या देशाचे अस्तित्वच धोक्यात; पाण्यातूनच जगाला आवाहन

अजित पवारांसह देवेंद्र फडणवीसांनी देखील आपापल्या कार्यकर्त्यांना वाढदिवस साध्यापणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्या आवाहनाला फार गांभीर्याने न घेता कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी जोरदार पोस्टरबाजी केली आहे.

पुणे शहर भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा ‘विकासपुरुष’ असा उल्लेख असलेले फ्लेक्स अनेक ठिकाणी लावले आहे. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून अजितदादांचे ‘कारभारी लयभारी’ असा उल्लेख फ्लेक्स सगळीकडे लावण्यात आले आहे. या निमित्ताने या शहरात झळकत असलेल्या फ्लेक्सचा चर्चेचा विषय ठरत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतर प्रमुख राजकीय पक्षांमधील ‘पोस्टर युद्ध’ आणखी वाढत जाणार असल्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  पुणे : दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार

अमोल मिटकरींचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा …
पुण्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनरबाजी केली आहे.तसेच त्यांचा पुण्याचे शिल्पकार असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र याचवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी

आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार..

मला वाटतं, यापेक्षा दुसरा मोठा जोक असू शकत नाही.

धन्य ते नेतृत्व आणि …….. धन्य त्यांचे अंधभक्त …

अशा शब्दात निशाणा साधला आहे.