पुणे : पुणे शहरात काँग्रेसची घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी आणि आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला बळ मिळून देण्यासाठी आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) लक्ष घालणार आहेत. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर चव्हाण यांच्या माध्यमातून अंकुश ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन सुरू आहे. पुण्यातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी चव्हाण काल पुण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेस भवनमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेनंतर शहर काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पुण्यात लक्ष घालण्याची विनंती चव्हाण यांना केली. त्यावर चव्हाण यांनी ‘पुण्याची जबाबदारी माझ्याकडे द्यावी, अशी मागणी मी पक्षाकडे करू शकत नाही. परंतु शहर काँग्रेसने प्रदेशाकडे ही मागणी केली, तर माझी तयारी आहे’, असे सांगत या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली. सायंकाळी लष्कर भागात चव्हाण यांच्याबरोबर काही शहर पदाधिकाऱ्यांची औपचारिक बैठकही झाली. त्यामध्येदेखील या विषयावर चर्चा झाली.

अधिक वाचा  "तुटेल एवढा ताणू नका"; परत जोडलं जाऊ शकणार नाही- अनिल परब

पुढील महिन्यात खास पुण्यासाठी वेळ देण्याचे त्यांनी कबूल केले. सध्या शहर काँग्रेसकडे एकहाती नेतृत्व नाही. मोठ्या प्रमाणावर गटबाजी असल्यामुळे पक्षात मरगळ आली आहे. महापालिका निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रदेशाध्यक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. शहरातील पक्षाच्या अनेक नेत्यांमध्ये त्याबाबत एकमत नाही. निवडणुकीसाठी महाविकास आघाडी झाली तर काँग्रेस पक्षाच्या पदात काहीच पडणार नाही. चव्हाण आणि पालकमंत्री अजित पवार यांचे फारसे सख्य नाही. त्यामुळे चव्हाण यांनी पुण्याची सूत्रे हाती घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर अंकुश ठेवणे शक्य होणार आहे. चव्हाण यांच्यावर पुण्याची जबाबदारी आली, तर शहराच्या राजकारणात नव्याने रंग भरणार हे निश्‍चित मानले जात आहे.