पुणे : शहरात दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या सुमारे महिनाभराच्या खंडानंतर सोमवारी दोनशेच्या आत आली. मागील दीड महिन्यापासून शहरातील रोजच्या नवीन रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आहे. यामुळे शहरात कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. मात्र, ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या मात्र अद्यापही कमी होत नसल्याचे चित्र दिसते आहे.

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज जिल्ह्यातील क्षेत्रनिहाय नवीन कोरोना रुग्ण, कोरोनामुक्त, झालेले मृत्यू आणि कोरोना चाचण्यांची संख्या दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

शहर व जिल्ह्यातील कोरोना मृतांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरातील रोजच्या मृत्यूची संख्या ही दहाच्या आत आली आहे. हीच संख्या दुसऱ्या लाटेत दीडशेहून अधिक होती. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अधिक वाचा  विधीमंडळ हिवाळी अधिवेशन मुंबईतच ? मुख्यमंत्री ठाकरेंचे 'हे' मुख्य कारण समोर

पुणे जिल्ह्यात आजअखेरपर्यंत एकूण १० लाख ७२ हजार २५८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १० लाख ४४ हजार ५२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य १८ हजार १७५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ९ हजार ५५५ सक्रिय (ॲक्टिव्ह) रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी ५ हजार ११५ रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. उर्वरित ४ हजार ४४० रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत.