नवी दिल्ली: पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशन सुरू होण्याआधी संसदेच्या आवारात सर्वांना लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली. तसेच, आपल्या बाहुवर (हातावर) लसीचा डोस घ्या आणि बाहुबली व्हा, असा संदेश त्यांनी साऱ्यांना दिला. त्यानंतर अधिवेशनाच्या सुरूवातीला पंतप्रधान मोदी नवनिर्वाचित मंत्रिमंडळाची ओळख सभागृहाला करून देत होते. पण त्याच वेळी विरोधकांनी विविध विषयांवरून गोंधळ केला. त्यामुळे मोदींनी आपलं भाषण मध्येच थांबवलं आणि सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना समज दिली.

पंतप्रधान मोदी यांचा नुकताच झालेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार चर्चेत होता. सर्वसमावेशक अशा प्रकारचे मंत्री यात समाविष्ट करण्यात आले आहेत असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले. तसेच, मंत्र्यांची ओळख ते करून देणार होते. तोच विरोधकांनी एकच गोंधळ सुरू केला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांच्या परिचयाची यादी तपशीलवार न वाचताच मंत्र्यांचे स्वागत केले.

अधिक वाचा  "महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही..."यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांनी ममतांना दिला सल्ला

“गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, दलित ओबीसी समाजाच्या लोकांची मुलं मंत्री झालेले काही लोकांना पाहावत नाही. महिलांना मंत्रिपदाचा मान मिळालेला पाहून काही लोकांनी दु:ख होतेय हे मला चांगलंच समजतंय”, असा टोला त्यांनी विरोधकांना लावला आणि ते पहिल्या भाषणात केवळ नव्या लोकांचे अभिनंदन करून खाली बसले.

हा प्रकार घडल्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी बाकावरील सदस्यांना समज दिली. संसदेचे कामकाज शांततामय मार्गाने करा असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.

अधिवेशनाआधी मोदींचा साऱ्यांनाच खास संदेश-

“लस बाहुवर म्हणजेच हातावर घेतली जाते. त्यामुळे कोरोना विरोधातील लढ्यात लस घेतलेला बाहुबली बनतो. 40 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. कोरोनाच्या लढ्यात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कोरोनाविरोधात बाहुबली होऊन लढा देऊयात. आशा आहे की सर्वांनी एक तरी कोरोना लसीचा डोस घेतला असेल. पण तरीही संसदेत उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती करतो की करोना नियमांचं पालन करावं”, असा खास संदेश मोदींनी दिला.