पुणे – विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात दरवर्षी वारी सोहळा पार पडतो. मात्र यंदा सलग दुसऱ्या वर्षी पालख्यांचे प्रस्थान रा.प. महामंडळाच्या बसने होणार असून, यंदाच्या सारथ्याचा मान स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारांना मिळणार आहे. पालख्यांसाठी शिवशाही बसेसचे नियोजन केले असून, रविवारी बसेसची सजावट करण्यात येणार आहे. तर सोमवारी पालख्या पंढरपुरकडे रवाना होणार आहेत.

आषाढी एकादशीचे निमित्त साधून दरवर्षी लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीला जातात. परंतु, करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पायी वारीऐवजी पालख्या महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसने पंढरपुरकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मागील वर्षी एसटीच्या सजवलेल्या ‘विठाई’ बसेसमधून पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या होता. यंदा पालख्यांचे सारथ्य करण्याचा मान स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारांना मिळणार असून, याबाबत एसटी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.

अधिक वाचा  काँग्रेसशिवाय आघाडी ही मोदींना मदतच; चव्हाणांचा निशाणा

श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज (आळंदी), श्री संत तुकाराम महाराज (देहू), श्री संत सोपानदेव महाराज आणि श्री संत चांगावटेश्‍वर महाराज या चार संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपूर येथे जाणार आहेत.

या अनुषंगाने प्रत्येक पालख्यांसाठी प्रत्येकी दोन शिवशाही बसेसचे नियोजन एसटी प्रशासनाने केले आहे. या 8 एसटी बसेसच्या बरोबर ब्रेकडाऊन व्हॅनसह अनुभवी टीम, स्पेअर बसेस देखील आहेत. रविवारी या बसेसची सजावट करण्यात येणार असून,

सोमवारी संबंधित संस्थानांच्या वेळांनुसार या बसेस रवाना होणार आहेत. यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर, चिंचवड आणि सासवड या आगारांतील कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्ती केली असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अधिक वाचा  "महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही..."यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांनी ममतांना दिला सल्ला

चार पालख्यांसाठी स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारांतील 8 शिवशाही बसेसचे नियोजन केले आहे. सोमवारी सकाळी या पालख्या पंढरपुरकडे रवाना होणार आहेत.

– रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, पुणे

पालखी सोहळ्यासाठी आगारातील बसेस धावणार असल्याचा अत्यंत आनंद आहे. ही संधी आम्हाला मिळणे, हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. बहुदा ही पुण्याईच असावी. यामुळे आमच्या आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी खास गणवेश देखील तयार केले आहेत.

– अनिल भिसे, आगार व्यवस्थापक, शिवाजीनगर आगार

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि सूचना…

पालखी सुनियोजित पार पडण्यासाठी आवश्‍यक अशी सर्व दक्षता घेण्यात येत आहे. इंदापूर आणि नीरा येथे ‘स्पेअर बसेस’चे नियोजन केले आहे. नियोजित बसेसच्या तांत्रिक अडचणी देखील दुरुस्त केल्या आहेत.

अधिक वाचा  इराणमधील सफरचंदे बाजारात दाखल; सुकामेव्याची आवकही सुरळीत

याशिवाय ब्रेकडाऊन व्हॅनसाठी देखील अनुभवी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. कर्मचारी निर्व्यसनी असून, संपूर्ण मार्गावर मोबाईलचा वापर करू नये आदी सूचना देखील दिल्या असल्याचे भिसे यांनी सांगितले.