श्रीगोंदे : कोरोनाचा तालुक्यातील विळखा ढिला झाला असला तरी सुटलेला नाही. त्यातच कोरोना प्रतिबंधक लस देणाऱ्या केंद्रांवरचा गोंधळ वाढतच आहे. लसीचे प्रमाण कमी आणि लोकांच्या संख्या जास्त होत असल्याने सामान्यांना त्रास होतोय. या सगळ्यात तालुक्यातील ४४ हजार लोकांना फक्त एक डोस लस मिळाली असून अजून सुमारे दोन लाख लोक लसीच्या प्रतिक्षेत आहेत. लसीकरण केंद्रांवरचा गोंधळ कमी करण्यासाठी तहसीलदारांनी संयुक्त नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

नियोजनात प्रशासन पडतंय कमी…

आत्तापर्यंत एकूण बधितांची संख्या १२,९२४ झाली आहे. एकूण २६३ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला १९७ सक्रिय रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून २५ जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनूसार ३३ हजार १४१ लोकांना पहिला व ११ हजार ७७ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तालुक्याची लोकसंख्या तीन लाखाच्या घरात आहे. त्यातील लहान मुले सोडली तरी अंदाजे दोन लाख लोक अजूनही लसीशिवाय राहिलेली आहेत.

अधिक वाचा  कुसुमाग्रज निवासस्थानापासून वाजत गाजत ग्रंथदिंडी; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!

शहरात रोज व तालुक्यातील गावांमध्ये रोटेशन पध्दतीने लसीकरण सुरु आहे. काही आरोग्य केंद्रांवर रोज लसीकरण देण्यात येते. मात्र या लसीकरणात मोठा गोंधळ होत असून दिवसेंदिवस लोकांसह कर्मचाऱ्यांवरही त्याचा ताण येत आहे. दोन दिवसांपुर्वी लोणी व्यंकनाथ येथे लोकांची संख्या जास्त झाली आणि लस कमी प्रमाणात आली. त्यामुळे लोकांच्या उद्रेकाला स्थानिक कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. वरिष्ठ कार्यालयाकडून नेमकी किती लस येणार हे लवकर समजत नसल्याने प्रशासनाची पंचाईत होते, असे सांगितले जाते. काही ठिकाणी सामाजीक कार्यकर्ते लसीकरण केंद्रात प्रशासनाला मदत करीत असले तरी कुठेही प्रशासनाचे योग्य नियोजन होत नसल्याचे दिसते.

अधिक वाचा  धनुषला आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर

बाहेरच्या पाहुण्यांना लस; घरचे राहताय उपाशीच

श्रीगोंदे येथील लसीकरणाचे नियोजन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी करतात. गेल्या काही दिवसांपासून तेथे लसीकरणासाठी रांगेत ताटकळत थांबणाऱ्यांची संख्या मोठी असते पण प्रत्यक्षात लस कमी असते. त्यामुळे गोंधळ होतोय. तालुक्यातील महत्वाच्या काही गावात बाहेरील पाहुण्यांना बोलावून घेवून त्यांना मागच्या दाराने लस दिली जात असल्याचे आरोप होत आहेत.

काय करावे…

उद्याच्या लसीकरणाची नोंदणी आजच करावी,

येणारी लस किती आहे हे सांयकाळी लवकर माहिती व्हावे

ज्यांची नोंदणी झाली, त्यांनाच लस देण्यात यावी.

प्रशासनाने शहरातील केंद्रावर रोटेशन पध्दतीने नियोजनात सहभागी व्हावे.

अधिक वाचा  omicron Virus ची 23 देशांत धडक, WHO चा गंभीर इशारा

सामाजीक कार्यकर्त्यांना नियोजनात सामिल करुन घ्यावे.

महिलांच्या लसीकरणासाठी वेगळे दिवस ठेवावेत.

सोशल मिडीयाचा वापर करावा.