आळंदी – आषाढ शुद्ध दशमीला सोमवारी (ता. १९) आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माउलींच्या चांदीच्या चल पादुका एसटी महामंडळाच्या दोन शिवशाही बसने पंढरीकडे मार्गस्थ करणार आहेत. त्यांच्यासोबत जाणाऱ्या चाळीस जणांची यादी आळंदी देवस्थानने तयार केली आहे. त्यामध्ये मानाच्या दिंडीवाल्यांमध्ये रथापुढील पहिल्या नऊ आणि रथामागील पहिल्या नऊ दिंडीतील वारकरी, पुजारी, चोपदार, मानकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे पालखी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे यांनी दिली.

पंढरपूरला जाण्यासाठी माउलींच्या पादुकांसोबत स्वतंत्र पोलिस बंदोबस्त असणार आहे. एसटीच्या शिवशाही बसने पादुका नेताना या दोन बसमध्ये जास्तीत जास्त ४० व्यक्तींना पादुकांसोबत नेण्याची परवानगी आहे. पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, विश्वस्त योगेश देसाई, लक्ष्मीकांत देशमुख, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, ऊर्जितसिंह शितोळे सरकार, राजाभाऊ चोपदार व वारकरी, अशा ४० जणांसोबत माउलींचा सोहळा शिवशाही बसने जाणार आहे.

अधिक वाचा  सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये केला मोठा बदल

दरम्यान, माउलींच्या पादुकांवर आषाढ शुद्ध दशमीला सोमवारी (ता. १९) पहाटे चार ते सहा वाजेदरम्यान पवमान पूजा व अभिषेक होणार आहे. त्यानंतर ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्यावतीने माउलींना नैवेद्य दाखविला जाईल. त्यानंतर कीर्तन झाल्यानंतर आठ ते साडेआठच्या दरम्यान माउलींच्या पादुका पंढरीकडे मार्गस्थ करण्यासाठीची तयारी सुरू होईल. तत्पूर्वी एसटीच्या शिवशाही बसचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे. वारकऱ्यांना बसमध्ये प्रवेश देताना मास्क दिले जाणार आहेत.

अशी आहे तयारी

एसटीच्या दोन शिवशाही बसची सोय                    ४० वारकऱ्यांचा सहभाग

अधिक वाचा  सिंहगड रस्ता कागदावर ‘ड्रीम प्रोजेक्ट’ प्रत्यक्षात दिवसेंदिवस अर्धवट

पादुकांसोबत स्वतंत्र पोलिस बंदोबस्त         बसमध्ये चढण्यापूर्वीच वारकऱ्यांना मास्क

शिवशाही बसचे सॅनिटायझेशन करणार

देहूत संस्थानकडून वारीची जय्यत तयारी

देहू – आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका सोमवारी (ता. १९) सकाळी आठ वाजता एसटी बसने मार्गस्थ होणार आहेत. संत तुकाराम महाराज संस्थानने पालखी सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या ४० वारकऱ्यांची कोरोना टेस्ट केली असून, सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आहे.

आषाढी एकादशी मंगळवारी (ता. २०) आहे. वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे एक जुलैला प्रस्थान झाले. मात्र, कोरोनामुळे सरकारने पालखी सोहळ्यातील पायी वारी रद्द केली. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात ठेवण्यात आल्या. गेले १८ दिवस पायी वारीतील विविध कार्यक्रम संस्थानतर्फे घेण्यात आले.

अधिक वाचा  ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर पालखी सोहळा पंढरपूरकडे एसटी बसने नेण्यात येणार आहे. यावर्षी दोन बसची व्यवस्था केली आहे. तसेच, यंदा ४० वारकऱ्यांना सोबत जाण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात पालखीप्रमुख संजय महाराज मोरे म्हणाले, ‘‘सरकारच्या आदेशानुसार संस्थानने वारीची तयारी केली आहे.

सोमवारी सकाळी आठ वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुका एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. दोन बसची सोय आहे. प्रत्येक बसमध्ये २० वारकरी असतील. पालखी मार्गानुसार बस पंढरपूरकडे रवाना होतील.’’

चोख पोलिस बंदोबस्त

आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी सोमवारी आणि मंगळवारी चोख पोलिस बंदोबस्त राहणार आहे, अशी माहिती देहूरोडचे पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिली.