पुणे – कोरोनामुळे गेल्या वर्षीच्या जूनपर्यंत मंदावलेली फ्लॅटची विक्री यंदा शहरात झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला पुन्हा ‘अच्छे दिन’ आले असून गेल्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत यंदा गृहखरेदी ७४ टक्क्यांनी वाढली आहे.

गेल्या वर्षी जानेवारी ते जून दरम्यान १० हजार ४९ घरे विकली गेली होती. यंदा हा आकडा जूनअखेरपर्यंत १७ हजार ४७४ वर पोचला असल्याचे ‘नाइट फ्रँक इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले. ‘नाइट फ्रँक इंडिया’ने त्यांचा ‘इंडिया रिअल इस्टेट जानेवारी-जून २०२१’ हा रिअल इस्टेट बाजारपेठेचा अभ्यास करणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे.

अधिक वाचा  इराणमधील सफरचंदे बाजारात दाखल; सुकामेव्याची आवकही सुरळीत

त्यात देशातील आठ मोठ्या बाजारपेठांमधील निवासी मालमत्तेच्या स्थितीचे मूल्यमापन केले आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे जूनपर्यंतची फ्लॅटची विक्री कमी झाली होती.

विक्री वाढल्याची कारणे

मार्चपर्यंत असलेली मुद्रांक शुल्कातील सवलत

गृहकर्जावर कमी झालेले व्याजदर

मोठ्या घरांसाठी वाढलेली मागणी

पहिल्या लाटेनंतर जाणवू लागलेली स्वतःच्या स्वतंत्र घराची गरज

विकासकांनी दिलेल्या ऑॅफर

पश्‍चिमेकडील औंध, बाणेर, वाकड, हिंजवडी, बावधन, पाषाण आणि पूर्वेकडील विमाननगर, खराडी, वाघोली, हडपसर, धानोरी येथील सूक्ष्म बाजारपेठांनी पुण्यातील घरांच्या विक्रीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. जून २०२१ पर्यंत पश्चिमेकडील बाजारपेठाच्या नवीन विक्रीत सर्वाधिक ३९ टक्के वाटा आहे. तर पूर्वेकडील भागाचा हिस्सा २३ टक्के आहे. – परमवीर सिंग पॉल, पुणे शाखा संचालक, नाइट फ्रँक इंडिया