पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 31 कर्वेनगर-वारजे भागातील नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने व कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी आपल्या परिसरात राहणाऱ्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी दोन महिन्यापूर्वी एक संकल्पना मांडली होती.

नागरिकांनी आपल्या सोसायटी, आजूबाजूच्या परिसरातील बंद आणि नादुरुस्त असलेल्या सायकल आम्हाला आणून द्याव्यात, असे आवाहन प्रभागातील नागरिकांना केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत परिसरातील नागरिकांनी दुधाने यांच्याशी संपर्क करून नादुरुस्त आणि बंद पडलेल्या सायकली सेवाभावनेच्या वृत्तीने आणून दिल्या. प्रभागातील वस्ती भागातील गोरगरीब, गरजू विद्यार्थी शोधून त्या सर्व विद्यार्थ्यांना ‘मदतीचा एक हात’ म्हणून ओंकार चॅरीटेबल ट्रस्ट व नगरसेविका सौ.लक्ष्मीताई दुधाने यांनी स्वखर्चाने एकूण 40 सायकली दुरुस्त केल्या. सौ. दुधाने यांच्या हस्ते या सर्व सायकली आज विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले.

अधिक वाचा  Omicron व्हेरियंट पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

यावेळी कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने, उपाध्यक्ष संतोष बराटे, कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे, कामगार सेल अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, व्हीजेएनटी सेलचे पदाधिकारी विष्णू सरगर, प्रभाग अध्यक्ष किशोर शेडगे विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. मोफत सायकल भेट दिल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते बघून सर्व पदाधिकारी भारावून गेले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.