आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठू माऊलीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे मंदिरातील दर्शन रांगेतून एकाची निवड करुन मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान दिला जातो. पण, गेल्यावर्षीपासून करोनामुळे सर्वकाही बंद असल्याने वारीवरही बंधने घालण्यात आली. त्यामुळे मंदिरातच सेवा देणाऱ्या एका सेवेकऱ्याची निवड करुन महापूजेचा मान दिला जात आहे. यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यातील दांम्पत्याला हा मान मिळाला आहे.

केशव शिवदास कोलते(७१) व इंदूबाई केशव कोलते (६६) रा. संत तुकाराम मठ, वर्धा असे महापूजेचा मान मिळालेल्या दांम्पत्याचे नाव आहे. हे दोघेही आषाढी एकादशीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेत सहभागी होणार आहे. केशव कोलते हे गेल्या वीस वर्षांपासून एकटेच पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात २४ तास वीणा वाजवून सेवा करीत आहे. त्यांच्या पत्नी इंदूबाई व मुलगा ओमप्रकाश कोलते हे वर्ध्यातील घरी राहतात. त्यांना चंदा आणि नंदा नावाच्या दोन मुलीही आहेत. ते वीस वर्षांपासून माऊलींच्या सेवेत आहेत.

अधिक वाचा  कर्नाटकात ओमिक्रॉन : 2 आठवडे भारताला महत्त्वाचे- आरोग्य तज्ज्ञ

पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहणीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, प्रकाश जवंजाळ, कार्यकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी मानाचा वारकरी म्हणून त्यांची निवड केली आहे.

पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात आठ वीणेकरी पहारा देण्याची सेवा करतात. यापैकी दोन विणेकऱ्यांना मागील वर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान मिळाला होता. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील डवलापूर या गावचे कवडू नारायण भोयर व कुसूमबाई भोयर या दाम्पत्याचा समावेश होता. यावर्षीही वर्ध्यातील केशव शिवदास कोलते व इंदूबाई केशव कोलते यांना मान मिळाला आहे.