भारताच्या शेजारील देशांशी असलेल्या सीमेवर कुंपण घालण्याचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे. ते भारतीय सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) १८ व्या शौर्य पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. अमित शाह यांनी देशाच्या सुरक्षेसाठी शहीद झालेल्या बीएसएफच्या जवानांच्या कार्याला सलाम केला. तसंच सीमेवर दहशतवाद्यांशी दोन हात करताना भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याचा त्यांनी सन्मान केला.

“देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व जवानांना मी सलाम करतो. भारतीय जवान सीमेवर तैनात आहेत म्हणून आपण सुखानं जगत असतो. जवानांमुळेच देशात आत शांतता आणि लोकशाही नांदत आहे. देशाच्या संरक्षणासाठी भारतीय जवानांनी दिलेल्या बलिदानाला कधीच विसरता येणार नाही”, असं अमित शाह म्हणाले.

अधिक वाचा  पतित पावन तर्फे अधिकाऱ्यास घेराव

भारताच्या शेजारील देशांशी असलेल्या सीमेवर कुंपणाचं काम सुरू असून त्यात कुठंही अपूर्ण काम राहिलं तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. भारतीय सीमेला संपूर्णपणे कुंपणानं बंदिस्त करण्याचं काम अद्याप सुरू आहे. २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि देशाच्या सीमा पूर्णपणे बंदिस्त होतील, असं आश्वासन अमित शाह यांनी यावेळी दिलं. सीमा सुरक्षा हीच राष्ट्रीय सुरक्षा असून आपल्या समोर अनेक अडचणी आहेत. पण भारतीय जवानांवर पूर्ण विश्वास आहे, असंही ते म्हणाले. भारतासमोर सध्या घुसखोरी, मानवी तस्करी, हत्यारांची तस्करी आणि ड्रोन हल्ला अशी अनेक आव्हानं आहेत. पण या सर्व आव्हानांत तोंड देण्यासाठी आपले जवान सज्ज आहेत, असं अमित शाह यांनी सांगितलं.