पुणे : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी २३ ऑगस्टपर्यंत स्वतंत्र ‘सीईटी’ परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून (ता. १९) राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होणार असल्याचे माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या लेखी परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाचा पेच सोडविण्यासाठी ‘सीईटी’ परीक्षा घेण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. त्याप्रमाणे आता राज्य मंडळामार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नियोजन सध्या अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना ‘सीईटी’साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी राज्य मंडळामार्फत मंडळाच्याच संकेतस्थळावर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.

अधिक वाचा  बार्बाडोस प्रजासत्ताक; ब्रिटनच्या राणीचा ४०० वर्षांचा अंमल संपला

विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक टाकून ‘सीईटी’ परीक्षेचा अर्ज ओपन करता येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावीच्या निकालाचे गुण अपडेट केलेले असतील. ‘सीईटी परीक्षा देण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का’ आणि ‘सीईटी परीक्षा देण्यासाठी तुम्ही इच्छुक नाही’ असे दोन पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील. त्यातील पर्याय निवडून विद्यार्थ्यांना पुढील अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सीईटी’ परीक्षा विनामूल्य असेल, मात्र अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

‘सीईटी’ परीक्षेचे वैशिष्ट्ये

– राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १०० गुणांची असेल परीक्षा

अधिक वाचा  राज्यात जिल्हा बँक : भाजपला मोठा झटका तर मविआ चे वर्चस्व

– इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे बहुपर्यायी प्रश्न

– राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार नाही

– अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार

– परीक्षेमध्ये मराठीचा पर्याय उपलब्ध नसेल