नवी दिल्ली- काही राज्यातील वाढती रुग्ण संख्या चिंताजनक आहे. गेल्या आठवड्यातल्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण आणि 84 टक्के मृत्यू हे आजच्या बैठकीला उपस्थित असलेल्या राज्यांमधील आहेत.

ज्या राज्यांमध्ये दुसरी लाट उत्पन्न झाली तिथे आधी परिस्थिती सामान्य होईल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र, केरळ आणि महाराष्ट्रात वाढती रुग्ण संख्याचिंतेचे मोठे कारण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक,ओदिशा, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कोविड बाबतच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी केंद्रीय गृह मंत्री आणि आरोग्य मंत्रीही उपस्थित होते.

अधिक वाचा  माऊलींचे विचार समाजासाठी ७२५ वर्षानंतरही प्रेरक - राज्यपाल

नरेंद्र मोदी म्हणाले, आपण सर्व जण अशा ठिकाणी आहोत जिथे तिसऱ्या लाटेची शक्‍यता सातत्याने वर्तवण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेपुर्वी, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये असाच कल दिसून आल्याचे सांगत पंतप्रधानांनी सावधगिरीचा इशारा दिला. म्हणूनच ज्या राज्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे अशा राज्यांमध्ये आपल्याला तत्पर उपाययोजना हाती घेत तिसऱ्या लाटेची शक्‍यता रोखायला हवी, असे ते म्हणाले.

दीर्घकाळ पर्यंत करोना बाधितांच्या संख्येत जर सतत वाढ होत राहिली तर करोना विषाणूमध्ये उत्परिवर्तन होण्याची शक्‍यता वाढते. यामुळे या विषाणूची नवनवीन रूपे अस्तित्वात येण्याचा धोका देखील वाढतो, हा तज्ञांनी व्यक्त केलेला दृष्टीकोन पंतप्रधानांनी अधोरेखित केला.

अधिक वाचा  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा

म्हणूनच, आपण सूक्ष्म-प्रतिबंधित विभागांवर विशेष लक्ष केंद्रित करून, चाचण्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध, उपचार आणि लसीकरण या धोरणाची अंमलबजावणी अखंडितपणे सुरु ठेवणे गरजेचे आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अधिक प्रमाणात रुग्ण सापडत आहेत त्यांच्याकडे विशेषत्वाने लक्ष देणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.