नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के.अँटनी यांच्याशी चर्चा केली. पवार आणि अँटनी या दोघांनीही काही वर्षांपूवी संरक्षणमंत्रिपद भुषवले. राजनाथ यांच्या निमंत्रणावरून पवार आणि अँटनी त्यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यांच्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. पुढील आठवड्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे.

त्या अधिवेशनात इतर मुद्‌द्‌यांबरोबरच भारत-चीन सीमेवरील तणावावरून मोदी सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, राजनाथ यांनी बोलावलेल्या बैठकीच्या माध्यमातून सरकारने विरोधकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

अधिक वाचा  'स्वच्छ'ला काम मिळताच साहित्य खरेदीही सुरू

राजनाथ यांच्याआधी राज्यसभेतील सभागृह नेते पियूष गोयल यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पवार यांची भेट घेतली. त्यामुळे अधिवेशन सुरळितपणे चालावे यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सूचित होत आहे. करोना संकटाची हाताळणी, महागाई, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन या मुद्‌द्‌यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करतील. त्यामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.