पुणे : राज्य शासनाने 31 जुलैपर्यंत प्रशासकीय बदल्या करण्यास परवानगी दिल्याने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी बदलीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका निकटवर्तीय अधिकाऱ्याला पत्र दिले आहे. तर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देखील एका अधिकाऱ्यांची शिफारस केली आहे. जिल्हयात प्रामुख्याने बहुतेक सर्व महत्त्वाच्या पदांवर पवार यांच्या मर्जीतील अधिका-यांची नियुक्ती होते. पण आता निवासी उपजिल्हाधिकारी पदासाठी वळसे-पाटील यांनी देखील शिफारस केल्याने कोण वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासनाच्या वतीने दर वर्षी एप्रिल-मे महिन्यात प्रशासकीय बदल्या केल्या जातात. परंतु गत वर्षी कोरोनामुळे प्रशासकीय बदल्या झाल्या नाही. मात्र जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बहुतेक सर्व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांसह नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, कुळ कायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस अशी अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

अधिक वाचा  राहुल भेटीनंतर राऊत म्हणाले, “तीन आघाड्या झाल्या तरी” काँग्रेसशिवाय एकजुट नाही,

यात काही अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य व मुदतपूर्व देखील बदल्या झाल्या. याचवेळी आरडीसी बदलाची देखील चर्चा होती. परंतु कटारे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसल्याने ही बदली टळली होती. आता कटारे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आरडीसी बदलीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यामध्ये कटारे यांना मुदतवाढ मिळणार का की नवीन अधिकारी कोण येणार याबाबत चर्चा सुरू आहे.

नवीन आरडीसी म्हणून संजीव देशमुख,संजय पाटील, सुनील थोरवे यांच्यासह ज्योती कदम या अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती. परंतु यात अजित पवार यांनी सध्या मुद्रांक शुल्क विभागात कार्यरत असलेले बारामती तालुक्यात व खेड प्रांत म्हणून काम केलेल्या हिंमत खराडे यांना पत्र दिले आहे. तर वळसे-पाटील यांनी त्याच्या जवळचे व जुन्नर तालुक्यातील सध्या सातारा आरडीसी असलेले सुनील थोरवे यांची शिफारस केली आहे.

अधिक वाचा  कोणत्याही निवडणुका OBC आरक्षणाशिवाय होऊ नयेत: पटोले

या सर्व अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यात तहसिलदार, उपजिल्हाधिकारी म्हणून चांगले काम केले आहे. यामुळे या सर्व अधिकाऱ्यांना जिल्ह्याची सर्व माहिती असून, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाचा अनुभव देखील आहे. यामुळे आता नक्की कोण येणार हे बदली नंतरच स्पष्ट होईल.