मुंबई: यंदाचं आर्थिक वर्ष 2022 मध्ये इन्फोसिस ही आघाडीची आयटी कंपनी 35,000 पदवीधर विद्यार्थ्यांची नियुक्ती करणार आहे. याबाबतची माहिती इन्फोसिसचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर प्रविण राव यांनी दिली आहे. मार्च तिमाहीमध्ये इन्फोसिसची कर्मचारी संख्या 2.59 लाख होती. तर जून अखेरिच्या तिमाहीमध्ये इन्फोसिसची कर्मचारी संख्या 2.67 लाख आहे. नवनवीन टॅलेंटची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे आम्ही या वाढत्या मागणीला पूर्ण करण्याचा निर्णय घेत आहोत. त्यामुळे आम्ही या 2022 च्या आर्थिक वर्षांत जगभरातून 35,000 पदवीधर विद्यार्थ्यांची नियुक्ती करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलंय.

डीजीटल प्रतिभेच्या मागणीमध्ये वाढ झाली असल्यामुळे या नियुक्त्या होणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम राबवले आहेत. यामध्ये एम्प्लॉयी एंगेजमेट इनिशिएटीव्ह, करीअर एक्सलरेशन अपॉरच्यूनिटीज, कॉम्पेसेशन रिव्ह्यूज् आणि डेव्हलपमेंट इंटरव्हेन्शन्स असे अनेक उपक्रम आम्ही राबवल्या असल्याचं राव यांनी म्हटलंय.

अधिक वाचा  ‘जवद’ चक्रीवादळाचा धोका, कसे पडले नाव जाणून घ्या.

बेंगळुरूस्थित इन्फोसिसने आज त्रैमासिक नफ्यात 22.7% टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. एकत्रित नेट प्रॉफिट 30 जूनपर्यंतच्या तीन महिन्यांत ₹ 5,195 कोटींवर पोचले आहे. शिवाय मिळणारा महसूल 17.9 टक्क्यांनी वाढून ₹27,896 कोटींवर पोहोचला आहे.

इन्फोसिसची प्रतिस्पर्धी आयटी कंपनी TCS ने यावर्षी 40 हजार फ्रेशर्सची नियुक्ती करणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. TCS चे पाच लाखांच्या वर कर्मचारी आहेत. त्यांनी मागील वर्षी जवळपास 40 हजार पदवीधर विद्यार्थ्यांची नियुक्ती केली होती.