नवी दिल्ली : ‘शिस्त, समर्पणवृत्ती आणि निर्धार या त्रिसूत्रीचा अंगिकार करुन खेळाला योग्य डावपेचांची जोड द्या, विजय तुमचाच होईल,’अशा अश्वासक शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना मंगळवारी दिल्या. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकआधी मोदी यांनी भारतीय स्पर्धकांशी संवाद साधला. त्यांनी १५ खेळाडूंशी चर्चा केली. यात मेरी कॉम, सानिया मिर्झा, दीपिका कुमार, प्रवीण जाधव, नीरज चोपडा यांचा समावेश होता. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री किरण रिजीजू उपस्थित होते.

ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धा प्रकारात भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. भारताकडून यावेळी १२६ खेळाडू राहणार असून, आतापर्यंत स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची ही सर्वाधिक संख्या आहे.

अधिक वाचा  शिरूर शिवसेनेचे एकला "चलो रे'! आघाडीत बिघाडी कायम

मोदी यांनी सुरुवातीला तीरंदाज दीपिका कुमारी हिच्याशी संवाद साधला. “पॅरिसमधील विश्वचषकात सुवर्णपदक पटकावून तू नंबर एक झाली आहेस. तुझा प्रवास उल्लेखनीय आहे. लहानपणी तुला आंबे आवडत होते. मग तीरंदाजीला सुरुवात कधी केली?” असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला. “मला यात सुरुवातीपासूनच आवड होती. मी धनुष्यापासून सुरुवात केली आणि हळूहळू आधुनिक धनुष्य हाती घेतले आणि पुढे गेली”, असे दीपिका कुमारीने सांगितले. आशीष कुमार याच्याशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा उल्लेख केला. विश्वचषकादरम्यान सचिनच्या वडिलांचे देहावसान झाले होते, मात्र दु:खातून सावरत पुन्हा एकदा क्रिकेट खेळला. आशीषच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्याचे सांत्वन करीत मोदी यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  फडणवीस आडनावाचा अर्थ सांगितला अन् त्यांच्या वक्तव्याची हवाही राज ठाकरेंनी काढली

बॉक्सर मेरीकोम हिच्याशी संवाद साधत तुझा आवडता खेळाडू कोण? असा प्रश्न तिला विचारला. यावर मेरीकोमने माझा आवडता खेळाडू मोहम्मद अली असल्याचे सांगितलं. तो माझ्यासाठी आदर्श आहे, असे मेरी म्हणाली. भालाफेकपटू नीरज चोप्रा याला मोदी यांनी मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले,’ऑलिम्पिकमध्ये अपेक्षांच्या ओझ्याखाली राहण्याची गरज नाही. निर्भिडपणे खेळा आणि पदक जिंका.’ मेरीकोम आणि हॉकी कर्णधार मनप्रीतसिंग भारताचे ध्वजवाहक राहतील. कुस्तीपटू बजरंग पुनिया हा समारोप सोहळ्याचा ध्वजवाहक असेल.

विजय मिळाल्यानंतर एकत्र आईस्क्रीम खाऊ
मोदी यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्याशी संवाद साधला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर एकत्र आईस्क्रीम खाऊ, असे पंतप्रधान म्हणाले. सिंधूला तिचे आई-वडील आईस्क्रीम खाऊ देत नाहीत, याचा उल्लेख करत मोदींनी हे आश्वासन दिले.