पुणे : कोकणात बहुतांश भागात दमदार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काही ठिकाणी गेल्या २४ तासांत २५० ते ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबई परिसरासह रत्नागिरीत जोरदार पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वरलाही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडय़ातील परभणी येथे गेल्या २४ तासांत या भागातील आजवरचा सर्वाधिक २३२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे या भागात जनजीवन विस्कळीत झाले असून, पाच हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही भागांत मंगळवारीही जोरदार पाऊस होणार असून, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आदी भागांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

अरबी समुद्रातून सध्या बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात आणि त्यालगतच्या भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. काही भागांत संततधार सुरू आहे. मुंबई आणि परिसरातही सोमवारी पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्य़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाऊस होत आहे. रत्नागिरीत सोमवारी दिवसभरात संध्याकाळी पाचपर्यंत १०२ मिलिमीटर पाऊस झाला. या कालावधीत मुंबईत ४७ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वरसह कोल्हापूर, सातारा आदी भागांत पावसाची नोंद झाली. मराठवाडय़ात परभणी आणि विदर्भातील अमरावती, वर्धासह काही ठिकाणी पाऊस झाला.

अधिक वाचा  कमी गुंतवणूकीमध्ये दरमहिना 60 हजार रुपये कमवा, SBI चा धमाका

बंगालच्या उपसागरातून सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा प्रभाव पश्चिम-उत्तर भागातील राज्यांपर्यंत आहे. त्यामुळे २३ दिवसांपासून दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांत थांबलेला मोसमी पावसाचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. या क्षेत्राचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाडय़ात काही भागांत पाऊस होतो आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील चार दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे.

२४ तासांतील पाऊस

कोकण : मुरुड (३५० मि.मी.), दापोली (२३० मि.मी.), कणकवली, म्हसळा, श्रीवर्धन (२१० मि.मी.), वैभववाडी (२०० मि.मी.), म्हापरा, पेडणे (१९० मि.मी.), चिपळूण (११८ मि.मी.), हर्णे (१६० मि.मी.), मालवण (१५० मि.मी.), देवगड, मंडणगाव, राजापूर, देवरुख (१४० मि.मी.).

अधिक वाचा  'पुष्कर' प्रकल्प नाते विश्वासाचे.. हे ब्रीदवाक्य सार्थकी लावेल; आ. पाटील

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर, राधानगरी (७० मि.मी.), पन्हाळा, श्रीरामपूर, येवला (५० मि.मी.)

मराठवाडा : परभणी (१६० मि.मी.), अर्धापूर (१२० मि.मी.), धर्मबाद, पूर्णा (९० मि.मी.), औढा नागनाश , मदखेड (८० मि.मी.), जळकोट, उमारी (७० मि.मी.), कंधार, वसमत (६० मि.मी.)

विदर्भ : धरणी, तेलहरा (५० मि.मी.), मेहकर (४० मि.मी.), अकोला, ब्रह्मपुरी, चिखलदरा, पातूर, मूर्तिजापूर संग्रामपूर (३० मि.मी.)

पाऊसभान

१३ जुलै : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्य़ांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी. पुणे जिल्हा घाटक्षेत्र, औरंगाबाद, जालना जोरदार पावसाची शक्यता.

१४ जुलै : मुंबई, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज. परभणी, हिंगोली, नांदेड हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.

अधिक वाचा  माऊलींचे विचार समाजासाठी ७२५ वर्षानंतरही प्रेरक - राज्यपाल

१५ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्य़ांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज.

वीज कोसळून देशात ४१ ठार

राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात वीज कोसळून गेल्या २४ तासांत एकूण ४१ नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. वीज कोसळून राजस्थानात २३ जण दगावले, तर २७ जण जखमी झाले. उत्तर प्रदेशात १२ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मध्य प्रदेशात सहा जणांचा मृत्यू झाला आणि ११ जखमी झाले.