लंडन : एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करत इंग्लंडने डेन्मार्कचे कडवे आव्हान २-१ असे परतवले. या रोमांचक विजयासह इंग्लंडने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे १९६६ सालच्या विश्वविजेतेपदानंतर इंग्लंडने पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. जेतेपदासाठी इंग्लंडला आता तगड्या इटलीविरुद्ध खेळावे लागेल. जमेची बाजू म्हणजे घरच्या मैदानावर रविवारी अंतिम सामना होणार असल्याने इंग्लंडला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळेल.

डेन्मार्कने जबरदस्त सुरुवात करताना इंग्लंडवर कमालीचे दडपण ठेवले. इंग्लंडचा हुकमी खेळाडू कर्णधार हॅरी केन याला घेरताना डेन्मार्कने त्याला फारशी संधीच दिली नाही. त्यातच, मिकेल डॅम्सगार्ड याने ३० व्या मिनिटाला गोल करत डेन्मार्कला १-० आघाडी मिळवून दिली.

अधिक वाचा  पुणे मेट्रोची ट्रायल रन अजित पवारांच्या उपस्थितीत पार

मात्र, त्यांचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. ३९ व्या मिनिटाला सिमॉन जाएरकडून झालेल्या स्वयंगोलामुळे इंग्लंडला बरोबरीची आयती संधी मिळाली. हाच स्वयंगोल डेन्मार्कसाठी निर्णायक ठरला. यानंतर दोन्ही संघांनी भक्कम बचाव करत निर्धारित वेळेपर्यंत बरोबरी कायम राखली.

केनने रचलेल्या अनेक आक्रमक चालींमुळे डेन्मार्कच्या खेळाडूंमध्ये तणाव निर्माण झाला. शिवाय यानसेन याला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागल्याने डेन्मार्कला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. १०४ व्या मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी मिळाली. कर्णधार केनने मारलेली किक डेन्मार्कच्या गोलरक्षकाने अडवली, मात्र चेंडू हातून सुटला आणि ही संधी साधत केनने रिबाऊंड किकवर गोल साकारत इंग्लंडचा विजय निश्चित केला.